फुले दांम्पत्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे 27 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन -प्रा. माणिक विधाते
नियोजित पुतळ्याचे डिजाईन समाजबांधवांपुढे सादर
नगर (प्रतिनिधी)- शहरातील माळीवाडा वेस येथे उभारण्यात येणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित पुतळा उभारणीच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले कृती समितीच्या वतीने झालेल्या बैठकीत सदर पुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन 27 जुलै रोजी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते संध्याकाळी 5 वाजता होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तर हा कार्यक्रम फक्त माळी समाजापुरता मर्यादीत न ठेवता फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या सर्व समाजाला बरोबर घेऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर नियोजित पुतळ्याचे आकर्षक डिजाईन समाजबांधवांपुढे सादर करण्यात आले.

गाडळकर मळा येथील शिवशंकर लॉन्स येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले कृती समितीचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले, उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी नगरसेवक ॲड. धनंजय जाधव, कृती समितीचे सचिव अशोक कानडे, ज्ञानेश्वर रासकर, बाजार समितीचे संचालक संतोष म्हस्के, श्री विशाल गणेश देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, बाळासाहेब आगरकर, डॉ. रणजीत सत्रे, मनोज गाडळकर, दत्ता गाडळकर, फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर, सावता परिषदेचे गणेश बनकर, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, प्रकाश इवळे, अनिल इवळे, राजेंद्र पडोळे, विनोद पुंड, रमेश चिपाडे, कॅप्टन सुधीर पुंड, ब्रिजेश ताठे, डॉ. केतन गोरे, रामदास फुले, अमोल भांबरकर, रेणुका पुंड, कल्याणी गाडळकर, श्रद्धा जाधव आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी आमदार संग्राम जगताप यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. ही वास्तविक स्व. अरुणकाका जगताप यांची संकल्पना होती. सर्व समाजाच्या माध्यमातून पुतळ्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आल्याने वाद निर्माण न होता, सर्वानुमते निर्णय घेतले जात आहे. 13 नोव्हेंबर 2022 पासून महापालिकेत माळी समाजाची बैठक घेऊन पूर्णकृती पुतळा बसविण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर कृती समितीची स्थापना, महासभेत ठराव, महापालिकेच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याची त्यांनी माहिती दिली.
तर 27 जुलै रोजी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते संध्याकाळी 5 वाजता पुतळा उभारणी व सुशोभीकरणाच्या कामाचे भूमीपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व आजी-माजी महापौर, नगरसेवक, माजी नगराध्यक्ष व सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित केले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
किशोर डागवाले म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्णत्वास जात आहे. कृती समितीने देखील उत्तम प्रकारे पाठपुरावा करुन काम अंतिम टप्प्यात आनले आहे. फुले दांम्पत्यांचा हा भव्य-दिव्य पुतळा शहराची शोभा वाढवून सर्व समाजाला प्रेरक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंडितराव खरपुडे यांनी या फुले दांम्पत्यांच्या पुतळा उभारणीच्या माध्यमातून शहरातील माळी समाज एकत्र आल्याचे स्पष्ट केले. ज्ञानेश्वर रासकर यांनी माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांचे स्वप्न या पुतळ्याच्या माध्यमातून साकारले जात असल्याचे सांगितले. यावेळी अशोक कानडे, अशोकराव आगरकर, प्रकाश इवळे, बजरंग भुतारे, माजी नगरसेवक ॲड. धनंजय जाधव, डॉ. रणजीत सत्रे, अनिल बोरुडे, संतोष म्हस्के यांनी आपल्या भावना व्यक्त करुन विविध सूचना मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब भुजबळ यांनी केले.