डांबरीकरणाचे काम तातडीने सुरु करण्याची भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी
पावसाळ्यानंतर करण्यात आलेली पॅचिंग उखडून खड्ड्यात पडली भर
नगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 च्या पुन्हा झालेल्या दुरावस्थेमुळे अपघातांना आमंत्रण मिळत असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तातडीने सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीचे निवेदन भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशन रोड येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास दिले.
सदर रस्त्याचे काम तातडीने सुरु न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष शिवम भंडारी, दिनेश जोशी, मतीन शेख, विशाल (अण्णा) बेलपवार, संकेत झोडगे, सागर चवंडके, विजय नामदे, अभिजीत सपकाळ, दिनेश लंगोटे आदी उपस्थित होते.
भिंगार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 पुन्हा खड्डेमय झाला असून, यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था झाल्याने भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पाठपुरावा करुन रस्त्याचे पॅचिंगचे काम करुन घेण्यात आले होते. मात्र सध्या रस्त्यावर पॅचिंगसह अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाली असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडून या रस्त्याच्या कामाला तातडीने प्रारंभ होवून दर्जेदार काम करण्याची मागणी भगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
सदर प्रश्नी नव्याने रुजू झालेले राष्ट्रीय महामार्ग कार्यालयीन अधिकारी घटमळ यांच्याशी संपर्क साधून रस्त्याचे काम हाती घेण्याची मागणी करण्यात आली. त्यांनी लवकरात लवकर वर्क ऑर्डर काढून कामास प्रारंभ करण्याचे आश्वासन दिले. सदर मागणीचे निवेदन लिपिक मनीष खरमाळे यांना देण्यात आले.
पावसाळ्यानंतर भिंगार येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 ची करण्यात आलेली डागडुजी देखील उखडली आहे. या महत्त्वाच्या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. खड्डेमय रस्त्यामुळे अनेक अपघात घडत असून, यामध्ये एखाद्याचा जीव जाण्याची वेळ आली आहे. या रस्त्यामुळे भिंगारकरांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, या रस्त्याचे दर्जेदारपणे डांबरीकरणाचे काम सुरु करावे. अन्यथा नागरिकांसह रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यास प्रशासनाने भाग पाडू नये. -शिवम भंडारी (शहराध्यक्ष, भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेस)