कचरा गाडीवरील सुका कचरा स्थानिक कचरा वेचकांना देण्याची मागणी
कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या वतीने आयुक्तांना निवेदन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील कचरा वेचक बांधवांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला असून, कचरा गाडीवरील सुका कचरा स्थानिक कचरा वेचकांना देण्याची मागणी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, अहिल्यानगर यांच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास येत्या 15 दिवसांत महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा समितीचे जिल्हा समन्वयक विकास उडाणशिवे यांनी दिला आहे.
अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी कचरा घंटा गाडी वर परप्रांतीय कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदारामार्फत या कामगारांना नियमित वेतन दिले जात असतानाच, त्याचबरोबर कचरा गाडीवरील सुका कचराजसे की प्लास्टिक, कागद, लोखंडगोळा करून त्याची विक्री केली जात आहे. यामुळे या कामातून दुहेरी उत्पन्न मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका स्थानिक कचरा वेचकांना बसत आहे. सुका कचरा मिळत नसल्याने त्यांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन बंद झाले असून, अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कचरा वेचक हे समाजातील अत्यंत दुर्बल घटक असल्याने त्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये स्थानिक कचरा वेचकांना सोबत घेऊन कचरा व्यवस्थापन यशस्वीपणे राबवले जात आहे. स्वच्छ पुणे, अवनी कोल्हापूर आणि स्त्री मुक्ती संघटना यांसारख्या संस्थांनी स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून प्रभावी कामगिरी केली आहे. या उपक्रमांमुळे संबंधित शहरांमध्ये स्वच्छतेचा स्तर उंचावला असून, कचरा वेचकांना स्थिर रोजगारही उपलब्ध झाला आहे.
तसेच लाड समिती आणि बर्मन समिती यांच्या अहवालांमध्येही कचरा वेचकांना घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेत सहभागी करून घेतल्यास शहर अधिक स्वच्छ राहते व त्यांना रोजगार मिळतो, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
कचरा गाडीवरील सुका कचरा गोळा करण्याचा हक्क स्थानिक कचरा वेचकांना देण्यात यावा, ठेकेदारांकडून होत असलेल्या दुहेरी उत्पन्नावर तात्काळ नियंत्रण आणावे, स्थानिक कचरा वेचकांची अधिकृत नोंदणी करून त्यांना कामात प्राधान्य द्यावे, कचरा वेचकांना घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेत अधिकृत सहभाग द्यावा, केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार कचरा व्यवस्थापन राबवावे या सर्व मागण्यांवर 15 दिवसांत सकारात्मक निर्णय न घेतल्यास महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
