• Thu. Oct 16th, 2025

बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या टोळक्यांनी पैसे वसुलीसाठी व्यावसायिकाचे बंद पाडले दुकान

ByMirror

Dec 25, 2024

जीवे मारण्याची धमकी; व्यावसायिक दांम्पत्यांची पोलीस अधीक्षक व जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार

टोळक्यांवर अवैध सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी

नगर (प्रतिनिधी)- शहरात बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या टोळक्यांनी व्याजापोटी दहशतीने दुकान बंद करुन, सातत्याने त्यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार चितळे रोड येथील रद्दीचे व्यावसायिक संजय कोठारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. व्यवसायचे दुकान बंद करण्यात आल्याने कोठारी दांम्पत्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून सदरील टोळक्यांवर अवैध सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी केली आहे.


संजय कोठारी यांची शहरातील चितळे रोड येथे रद्दी विकत घेण्याचा व विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्यातून मिळणाऱ्या पैश्‍यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सन 2021 मध्ये खुब्याचा त्रास होत असल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले होते. दोन्ही खुब्याच्या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च लागणार होता. शारीरिक त्रास होत असल्याने व जवळ पैसा उपलब्ध नसल्याने त्यांनी परिचित असलेल्या सदरील लोकांकडून आर्थिक मदत घेतली. दवाखान्यासाठी सदरील व्यक्तींनी रोख व ऑनलाईन स्वरूपात रकमा दिल्या. सर्वजणांनी एक विचाराने अडचणीच्या काळाचा गैरफायदा घेऊन दिलेले उसनवारीचे पैसे 10 टक्के व्याजाने वसुल करण्याचा निर्णय घेतला व व्याजाच्या रकमेसह सदर रकमा मागण्यास तगादा लावला आहे.


एवढ्या मोठ्या प्रमाणात व्याज देऊ शकत नसल्याने, त्यांनी शहरात सुरु असलेले रद्दीचे दुकान दहशतीने बंद केले आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह हिरावला गेला असून, कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यामुळे कुटुंबाचे जीवन उध्वस्त झाले आहे. तर सदरील सावकारांच्या टोळक्यांकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ असून, त्यांच्याकडून जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


यामधील दोन सावकारांनी अडचणीचा गैरफायदा घेऊन रकमेचे स्टॅम्प दडपण आणून लिहून घेतले आहे. त्या आधारे ब्लॅकमेल करत आहे. तसेच कोरे धनादेश घेऊन खोट्या केसेस करण्याची धमकी दिली जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. अवैध सावकारी करणाऱ्या टोलक्यांकडून शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तर अवैध सावकारीतून व्याज वसुली करणारे व व्याजापोटी दहशतीने दुकान बंद करणाऱ्या टोळक्यांवर अवैध सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी कोठारी दांम्पत्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *