सैनिक बँकेत क्लार्क असलेल्या मुलाचे बेकायदेशीर निलंबन रद्द करण्याची मागणी
कोणतीही पूर्व सूचना न देता, ठराव घेऊन निलंबन करण्यात आल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- मुलाचे बेकायदेशीर निलंबन रद्द होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करत असलेले माजी सैनिक सुंदर मेहेर यांची उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि.29 जानेवारी) तब्येत खालवली. पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत क्लार्क म्हणून असलेल्या नितीन मेहेर यांना कोणतीही पूर्व सूचना व नोटीस न देता पुन्हा निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्यामुळे संपूर्ण कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असताना माजी सैनिक कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरु केलेले आहे.
बुधवारी माजी सैनिक सुंदर मेहेर यांची तब्यत बिघडल्याने तातडीने जिल्हा रुग्णालयातील पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन उपोषण सोडण्याची विनंती केली. मुलाचे बेकायदेशीर निलंबन रद्द होत नाही, तो पर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा आक्रमक पवित्रा मेहेर यांनी घतला आहे.
30 सप्टेंबर 2024 च्या मीटिंगमध्ये पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक चेअरमन, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मेहेर यांच्या निलंबनाचा ठराव घेतला. त्यानंतर दोन ते अडीच महिन्यानंतर 17 डिसेंबर 2024 ला जामखेड शाखा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाचे पत्र पाठविले. कोणतीही पूर्वसूचना व नोटीस न देता बेकायदेशीर पध्दतीने आकसापोटी ठराव घेऊन नितीन मेहेर यांचे निलंबन करण्यात आल्याचा आरोप मेहेर कुटुंबीयांनी केला आहे.
बँकेच्या व्यवस्थापनाने तात्काळ मेहेर यांचे निलंबन रद्द करून, त्यांना कामावर हजर करून घ्यावे, निलंबन काळातील पगार शासन नियमाप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, दिवाळी बोनस देण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आले आहे.