पोलीस वसाहतीच्या दुरावस्थेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या वतीने पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांना सुरक्षा देणारे पोलीसांचे कुटुंबीयच धोकादायक घरात राहत असताना तातडीने पोलीस वसाहतीच्या दुरावस्थेचा प्रश्न मार्गी लावून पोलीस बांधवांना चांगली घरे उपलब्ध करुन देण्याची मागणी मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली.
प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देवून या प्रश्नी लक्ष वेधले. तसेच याबाबत जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अल्ताफ सय्यद, उमंग ठाकरे, नवाज देशमुख, मुकेश कांबळे, नाजीम कुरेशी, नदिम शेख, अक्षय शिरसाठ, नदीम सय्यद, संजय पवार, वसिम पटेल, निलेश शेंडगे, पप्पू भाऊ, मुजीर सय्यद, अयान सय्यद, हाजिक सय्यद, सहाब सय्यद, कॅप्टन शकील सय्यद आदी उपस्थित होते.

शहरातील पोलीस वसाहतींची मोठी दुरावस्था झालेली आहे. पोलीस कर्मचारी धोकादायक घरात राहत आहे. कोरोनासह व इतर प्रत्येक संकटात पुढे राहून काम करणाऱ्या पोलीस दलातील बांधवांच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी चांगले घर असावे. पोलीस प्रशासन सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी व शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी रात्रंदिवस काम करत असतात. त्यांच्यामुळे सर्व नागरिक घरात सुरक्षित राहत आहे. मात्र पोलीस वसाहतीच्या दुरावस्थेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना पडक्या, गळक्या घरात राहण्याची वेळ आली असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलीस वसाहतीची दुरवस्था खूप वेदनादायी व मनाला चटका लावून जाणारी आहे. पोलीस वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य वाढलेले असून, या परिसरात अनेक प्रश्न प्रलंबीत आहे. पोलीसा वसाहतीचे प्रश्न सोडवून पोलीस बांधवांच्या कुटुंबीयांना चांगली घरे उपलब्ध होण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.
