• Tue. Oct 14th, 2025

सकल मराठा समाजाने एकजुटीने संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभे रहावे -निलेश म्हसे

ByMirror

Nov 18, 2024

मावळा प्रतिष्ठानचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- अंतरवली सराटी येथील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून केलेल्या अमानुष लाठीमारचा निषेध नोंदविण्यासाठी सर्वात अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार संग्राम जगताप हे होते. सकल मराठा समाजाने एकजुटीने संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभे रहाण्याचे आवाहन मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश म्हसे पाटील यांनी केले आहे.


नगर शहर विधानसभा निवडणुकीत आ. संग्राम जगताप हे सर्वमान्य असे उमेदवार ठरले असून, समाजातील सर्वच घटकांना सोबत घेत सर्वांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सतत आग्रही राहिले आहेत. याचप्रकारे आ. जगताप यांनी मराठा समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी देखील सातत्याने पाठपुरावा केलेला असून, मराठा समाजाच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नगर शहरात शिक्षणाची व त्यांच्या राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठीची इमारत उभी करण्यासाठी वारूळाचा मारुती रोड येथील नगर महापालिकेचा भूखंड मिळवून देण्यात व याठिकाणी असणारी तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी शासन स्तरावर मोलाची भूमिका निभावली आहे. त्याचप्रमाणे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पुणे रोड जवळ उभारण्यात येत असलेल्या वाचनालय व अभ्यासिकाच्या जागेचा प्रश्‍न देखील त्यांनी विशेष लक्ष घालून सोडविला असून, त्यांच्या सहकार्याने याठिकाणी इमारत बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे म्हसे यांनी स्पष्ट केले आहे.


नोव्हेंबर 2023 मध्ये मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या उपोषण स्थळी पोलिसांकडून अमानुषपणे लाठीमार करण्यात आला होता. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांकडून झालेल्या लाठीमारचा निषेध करण्यासाठी समाजातील सर्व जातीचे लोकं घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणारे संग्राम जगताप राज्यातील पहिले आमदार होते.

स्वतः सरकार मध्ये सहभागी असलेल्या सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना सरकारच्या माध्यमातून झालेल्या अन्यायाच्या विरोधात ठाम भूमिका घेणारा तसेच याप्रकरणी विधिमंडळात आवाज उठविण्याची घोषणा करून समाजाच्या अक्रोशात सहभागी होण्याचे काम त्यांनी केले. तर आरक्षणाच्या मागणीच्या प्रत्येक चळवळीत व जरांगे पाटलांच्या नगर दौऱ्यात आपले योगदान त्यांनी दिलेले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने याची जाणीव ठेवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पाठीशी समाजाची ताकद उभी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *