रस्ता बंद करणाऱ्यावर गुन्हा दाखल होऊनही रस्ता बंदच
वहिवाटीचा रस्ता खुला न झाल्यास ग्रामस्थांसह उपोषण करण्याचा दिव्यांग शेळके यांचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- पूर्ववैमनस्यातून व त्रास देण्याच्या उद्देशाने बंद करण्यात आलेला मौजे रूपेवाडी (शंकरवाडी) (ता. पाथर्डी) येथील वहिवाटीचा रस्ता खुला करुन देण्याची आर्तहाक दिव्यांग असलेल्या पोपट शेळके यांनी दिली आहे. चालता येत नसल्याने व रस्ता देखील बंद केलेला असल्याने घरा पर्यंत जाण्यासाठी रस्ता खुला करुन देण्याची मागणी त्यांनी केली आहे. रस्ता खुला करण्याचे प्रशासनाचे आदेश असताना व रस्ता बंद करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊन सुध्दा रस्ता खुला होत नसल्याने दिव्यांग शेळके यांनी ग्रामस्थासह पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तर हा रस्ता बंद करणाऱ्यांवर दिव्यांग अधिनियम 2016 अन्वये कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पूर्वी बंद करण्यात आलेला मौजे रूपेवाडी (शंकरवाडी) (ता. पाथर्डी) येथील वहिवाटीचा रस्ता शेळके यांच्या पाठपुराव्याने तत्कालीन गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत समितीचे कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये रस्त्याचे मोजमाप करुन हा रस्ता 14 जानेवारी 2022 रोजी खुला करुन देण्यात आला होता. मात्र हा रस्ता अनाधिकृतपणे मोहिते कुटुंबीयांनी पुन्हा 24 जुलै 2023 रोजी बंद केला आहे. गावातील बंद असलेला दक्षिण-उत्तर रस्ता घोडेगाव मिरी मुख्य रस्त्याला जोडणारा आहे. उत्तरेकडील लोहारवाडी व चांदा या गावांना जोडणारा हा रस्ता असल्याने उत्तरेकडील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. पाऊस आल्यास शेतामध्ये जाण्यासाठी देखील अडचण येणार आहे. शारीरिक दृष्टया अपंग असल्याने घरी व शेतात जाण्यासाठी हेळसांड होत आहे. तीन महिन्यापासून वाहन गावात लावून मोठी कसरत करुन घरी जावे लागत असल्याचे दिव्यांग शेळके यांनी स्पष्ट केले आहे.
29 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी प्रशासकीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी रस्ता खुला करून दिला. परंतु त्याच वेळेस सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना न जुमानता बाबासाहेब मोहिते यांनी हा रस्ता पुन्हा बंद केला. यावर 31 ऑक्टोबरला पाथर्डी पोलीस स्टेशनला ग्रामसेवक अशोक बोरुडे यांच्या फिर्यादीवरून बाबासाहेब मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा रस्ता अद्यापि खुला झालेला नाही. रस्ता बंद करणारे मोहिते कुटुंबीयांकडून शिवीगाळ करुन मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करुन संबंधितांवर दिव्यांग अधिनियम 2016 अन्वये कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेळके यांनी केली आहे.