नालेगाव मधून निघाली लक्ष्मीआई यात्रा
नगर (प्रतिनिधी)- शहरातील नालेगाव येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नालेगाव परिसरातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली होती. यामध्ये पारंपारिक वाद्यांच्या गजरात पोतराजसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कलशधारी महिला, पोतराज व घोड्यांच्या बग्गीत असलेल्या लक्ष्मीमातेच्या मुर्तीने सर्वांचे लक्ष वेधले. भंडाऱ्याची उधळण करीत भाविकांनी लक्ष्मीमातेचा जयघोष केला. सामाजिक कार्यकर्ते पवन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या यात्रेत संगीता पवार, शिवम पवार, लक्ष्मण सारसर, प्रशांत दळवी, भैय्या गोरे, गणेश पवार, यश पवार, आदित्य सकट, हर्षल सारसर, आदर्श साळुंके, मुन्ना शेख, गणेश भुजबळ, राहुल रोहकले, गौरव सोनिस, आकश दिवटे आदींसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या यात्रेला 45 वर्षाची परंपरा असून, पवार कुटुंबियांच्या वतीने दरवर्षी लक्ष्मीआई यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विधीवत पूजा करुन लक्ष्मी मातेची उत्सवमुर्तीची मिरवणुक शहरातून काढण्यात आली. संबळ, हलगी, ढोल व ताशांच्या निनादात पोतराजांनी स्वत:वर आसूडचे फटके ओढले. आसूड ओढताना चट्टचट्ट हा एकच आवाज परिसरात घुमला होता. यावेळी भाविकांसाठी भंडाऱ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते.