माजी सैनिकांच्या मध्यस्थीने संपला वाद;
समाजासमोर समेटाचे उदाहरण
नगर (प्रतिनिधी)- समाजात शांतता, समेट व सामंजस्याचा संदेश देणारे उदाहरण नवनागापूर येथे पाहायला मिळाले. माजी सैनिकांच्या संघटनांनी पुढाकार घेत नवनागापूरच्या गजानन कॉलनी येथील दोन कुटुंबांतील दीर्घकालीन गाळा वादाचा यशस्वी समेट घडवून आणला. शांततामय व पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली असून, समाजात सौहार्दाचा संदेश माजी सैनिकांनी दिला आहे.
गजानन कॉलनीतील डोंगरे कॉम्प्लेक्समध्ये नामदेव गायके व संध्याताई सांगळे या दोन कुटुंबांनी भागीदारीतून एक मेन्स पार्लर सुरू केला होता. परंतु काही काळानंतर त्यांच्या मध्ये गैरसमज व मतभेद निर्माण झाले, जे नंतर वादात परिवर्तित झाले. दोन्ही गटांनी स्थानिक सैनिक संघटनेकडे मध्यस्थीची विनंती केली.
या प्रकरणात जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि त्रिदल सैनिक संघ, अहिल्यानगर यांनी पुढाकार घेतला. मेजर निळकंठ उल्हारे, संजय म्हस्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी समेटासाठी दोन्ही पक्षांच्या बैठकांचे आयोजन केले. त्यानुसार निर्णय झाला की, गाळा खुल्या निलामीद्वारे विक्रीस ठेवण्यात येईल आणि मिळालेली रक्कम दोन्ही गटांमध्ये समान विभागली जाईल.
सदर निलामी नुकतीच ग्रामपंचायत कार्यालय, नवनागापूर येथे सकाळी 11 वाजता पार पडली. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, नातेवाईक व दोन्ही गट उपस्थित होते. त्रिदलचे अध्यक्ष संजय म्हस्के (मेजर) यांनी निलामीची प्रक्रिया पार पाडली. बाळासाहेब गायके यांनी 81 लाख रुपयांची उच्चांकी बोली लावली आणि गाळा घेण्याचा निर्णय जाहीर केला.
ठरावानुसार, व्यवहार आजपासून तीन महिन्यांच्या आत पूर्ण करणे अनिवार्य आहे. त्यानंतरच संबंधित व्यक्तीस गाळ्याचा ताबा देण्यात येईल. ठरलेल्या कालावधीत व्यवहार न झाल्यास संपूर्ण प्रक्रिया स्वतःहून रद्द समजली जाईल, असा ठराव एकमताने पारित करण्यात आला. या समेट प्रक्रियेत मेजर जालिंदर वाळके, अंबादास गवांडे, मारुती ताकपेरे, रघुनाथ शेवाळे, वसंत मुके, नामदेव गायके, बाळू गायके, सुनील गायके, विठ्ठल गायके, अरुण काशीद, सुरज काशीद, किरण काशीद, अर्जुन सांगळे, भास्कर सांगळे, करण सांगळे, गणेश गायके, संध्याताई सांगळे आदींची उपस्थिती होती.