बेकरीतील कामगारांवर जीवघेणा हल्ला प्रकरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- पाईपलाइन रोड येथील बेकरी हल्ला प्रकरणातील उर्वरीत आरोपी साहिल मंगेश पवार व कुणाल सचिन खंडेलवाल या दोन्ही आरोपींचे विशेष जिल्हा न्यायाधिश क्र.4 एम.एच. शेख यांनी जामीन अर्ज फेटाळून लावला. यापूर्वी या प्रकरणातील चार आरोपींचे जामीन फेटाळण्यात आले होते.
बेकरी हल्ला प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले सहा आरोपी हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या वतीने चार आरोपींचे जामीन अर्ज 29 जुलै रोजी ठेवण्यात आले होते, त्यामध्ये फिर्यादीच्या बाजूने ॲड. संकेत नंदू बारस्कर यांनी सविस्तर लेखी म्हणणे देऊन युक्तिवाद केला असता, न्यायलयाने चारही आरोपींचे जामीन अर्ज रद्द केले होते.
उर्वरीत दोन आरोपींचे जामीन अर्जावर नुकतीच सुनावणी होऊन, त्यामध्ये देखील फिर्यादी तर्फे म्हणणे देऊन युक्तीवाद केला असता सदर आरोपींचा देखील गुन्ह्यात सहभाग असून, फिर्यादीला जीवे मारण्याच्या हेतूने आरोपी यांनी मारहाण केली आहे. तरी सदर आरोपींचे जमीन अर्ज रद्द होवून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ॲड. बारस्कर यांनी न्यायालयापुढे केली. त्यावर आरोपी पक्षाने तीव्र विरोध दर्शविला, परंतू सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने उर्वरित दोन्ही आरोपींचा जामीन गुरुवारी (दि. 1 ऑगस्ट) फेटाळून लावला. सदर प्रकरणात कासीम कासार (जखमी) यांच्या वतीने ॲड. संकेत नंदू बारस्कर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. प्रकाश सावंत, ॲड. स्वप्नील खरात, ॲड. आकाश अकोलकर यांनी सहकार्य केले.