माणिक वर्मांच्या बहारदार गाण्यांनी नगरकर मंत्रमुग्ध
नगर (प्रतिनिधी)- सावळाच रंग तुझा, त्या सावळ्या तनुचे, अमृताहुनि गोड, घननिळा लडिवाळा… अशा एकाहून एक सरस गीतरचना सादर होत होत्या…. गानविदुषी माणिक वर्मांनी अजरामर करून ठेवलेल्या या रचना ऐकताना रसिक काही तास जणू जुन्या काळातच गेले होते… निमित्त होते माणिक मोती या संगीत मैफलीचे. संगीत रसिक धनेश बोगावत व अवतार मेहेरबाबा केंद्राद्वारे आयोजित अन् श्रुती संगीत निकेतन प्रस्तुत माणिकमोती या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

गायिका माणिक वर्मांची जन्मशताब्दी वर्ष यंदा 16 मेपासून सुरू झाले आहे. हे औचित्य साधून, या विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. याद्वारे श्रुती संगीत निकेतनच्या कलाकारांनी माणिक वर्मांना स्वरांजली वाहून अभिवादन केले. त्यांची गाजलेली गीते अन् समर्पक माहितीपूर्ण लक्षवेधी निवेदनातून माणिक वर्मांच्या स्मृती जागविल्या. जाणकार रसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे ही मैफल उत्तरोत्तर रंगतच गेली.
मकरंद खरवंडीकर यांनी गायलेल्या मेहेरबाबा आलो मी दर्शन घ्याया… या मेहेरबाबांच्या भजनाने मैफलीचा औचित्यपूर्ण प्रारंभ झाला. नाथ हा माझा, माळपदक विठ्ठल, चांदण्या रात्रीतले, खरा तो प्रेमा, क्षणभर उघड नयन देवा, मुरलीधर चित्त चकोरा आदी अजरामर रचनांना दाद मिळाली. नाट्यपदे, भक्तिगीते, भावगीते अशा एकापेक्षा एक सरस गीते सादर झाली. जनी नामयाची रंगली कीर्तनी या भैरवीतील रचनेने या रंगलेल्या मैफलीची सांगता झाली. अनुजा कुलकर्णी, रिद्धी कुलकर्णी, प्रतीक्षा काळे, वेदांत कुलकर्णी, किरण जोशी आणि डॉ. धनश्री खरवंडीकर या कलाकारांनी समर्थपणे आपल्या गायनातून माणिक वर्मांना विनम्र अभिवादन केले. अनुजा कुलकर्णींनी गायलेल्या त्या चित्तचोरट्याला अन् डॉ. खरवंडीकरांच्या खरा तो प्रेमा या नाट्यपदाला रसिकांनी वन्स मोअरची दाद दिली.
मैफलीचे निवेदन अभय नरहर जोशींनी केले. माहितीपूर्ण अन् रंगतदार शैलीत त्यांनी माणिक वर्मांच्या वाटचालीचे अन् शैलीचे पैलू रसिकांसमोर उलगडले. त्यालाही उत्तम दाद मिळाली. माणिक वर्मांचे सोज्ज्वळ, सात्विक, साधे अन् वैविध्यपूर्ण गायकीने परिपूर्ण असलेले व्यक्तिमत्त्वच या गीत-निवेदनातून मांडले गेले. या सर्व कलावंतांना मकरंद खरवंडीकर यांनी हार्मोनियमची पूरक अन् प्रभावी साथ दिली. शेखर दरवडे (तबला) अन् त्यांचे पुत्र अनुज दरवडे (तालवाद्य) यांच्या साथीलाही विशेष दाद मिळाली. या मैफलीने जुन्या काळातील मैफलींची आठवण झाल्याचीही प्रतिक्रिया रसिकांकडून व्यक्त झाली. सर्व कलाकारांचा या प्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला.
या मैफिलीस जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे, मेहेरबाबा सेंटरच्या राज कलचुरी, मिस. जेनीस, भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, प्रसिद्ध सुफी गायक पवन नाईक, गीत रामायण गायक प्रसाद शेटे, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद भणगे, प्रतिभाताई धूत, अनुराधा आठरे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीरज करंदीकर व डॉ. दीप्ती करंदीकर, डॉ. हेमंत नाईक, प्रीती नाईक, सौ. शुभा बोगावत, अशोक गांधी जरीवाला, विलास बडवे, ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, सतीश कुलकर्णी, सीए ज्ञानेश कुलकर्णी, श्रीराम जोशी, संगीत अभ्यासक आणि अनाहतचे प्रसाद सुवर्णपाठकी ओंकार देऊळगावकर, ॲड. आनंद कुलकर्णी, अविनाश शिरापुरी, संदीप कुलकर्णी, अशोक कुलकर्णी, नीलम जोशी, हेमंत नाईक, किशोर कुलकर्णी, बांधकाम व्यावसायिक अविनाश कुलकर्णी, बाळासाहेब पतंगे, अभिजीत अपस्तंभ, योगेश अनारसे, आदेश चव्हाण, आदिनाथ ठोंबरे, डॉ. स्मिता केतकर, डॉ. योगिनी वाळिंबे, महेश खोपटीकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शुभा बोगावत यांनी स्वागत केले. यावेळी अवतार मेहेरबाबांची प्रार्थना व आरतीने मैफलीचा समारोप झाला. या मैफलीच्या यशस्वीतेसाठी शुभा बोगावत, किशोर कुलकर्णी, श्रुती मुळे, राहुल मुळे, मिस. जेनीस, मधुकर डाडर आदींनी परिश्रम घेतले.
ज्येष्ठ संगीत अभ्यासक धनेश बोगावत यांनी माणिक मोती संगीत मैफिलीतील कलावतांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. अशा मैफिलींतून विविध स्थानिक उदयोन्मुख कलावंतांना सादरीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी अशा सुंदर मैफली सातत्याने आयोजित करण्यात येतील अशी ग्वाही दिली.
धनेश बोगावत अन् अवतार मेहेरबाबा केंद्राद्वारे आयोजित श्रुती संगीत निकेतन प्रस्तुत माणिकमोती या मैफलीत सहभागी कलावंत. (छाया-वाजिद शेख-नगर)