35 हजार फूट उंचीवर डॉ. सिमरनकौर वधवा यांची तत्पर वैद्यकीय मदत
इन-फ्लाइट आपत्कालीन प्रसंगात दाखवली विलक्षण मानवता
नगर (प्रतिनिधी)- गोवा येथून कौटुंबिक सहलीहून परतणाऱ्या नगर शहरातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सिमरनकौर वधवा यांनी गोवा ते हैदराबाद या इंडिगो विमानाच्या प्रवासात एका महिलेचे प्राण वाचवले. 35 हजार फूट उंचीवर घडलेल्या या आपत्कालीन प्रसंगात त्यांनी दाखवलेली तत्परता, वैद्यकीय कुशलता आणि मानवतेची जाणीव कौतुकास पात्र ठरली आहे.
गोव्यातून कोलकात्याला जाणाऱ्या एका प्रवाशाच्या पत्नीला अचानक दम्याचा अटॅक आला. तिला तीव्र श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवू लागला, ती अर्धवट शुद्धीत होती, अंग थरथरत होते. दिवसभर न खाल्ल्यामुळे आणि साखर न घेतल्यामुळे तिची अवस्था अधिकच बिघडत चालली होती. या घाईच्या प्रसंगी इंडिगोच्या क्रू मेंबर्सनी तत्काळ ऑक्सिजन सिलिंडर व मास्क उपलब्ध करून दिले, मात्र परिस्थिती नियंत्रणात येत नव्हती.
या वेळी विमानात काहीच रांगा पुढे बसलेल्या डॉ. सिमरनकौर वधवा यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढे येत त्या महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी त्या महिलेची नाडी, रक्तदाब तपासला. तिच्या पतीचे समुपदेशन करत त्याला धीर दिला. महिलेचा दम्याचा अटॅक आणि शक्य असलेला हायपोग्लायसेमिया लक्षात घेता त्यांनी क्रू मेंबर्सकडे साखर टाकलेली काळी कॉफी मागवली. ती महिला अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असतानाही डॉ. वधवांनी तिला काळजीपूर्वक कॉफी पाजली, खोलवर श्वास घेण्यास लावले.
केवळ 15 मिनिटांचा तो प्रसंग अत्यंत भयावह होता, परंतु डॉ. वधवा यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे तो प्रसंग शांततेत रूपांतरित झाला. ती महिला पूर्णपणे शुद्धीत आली आणि हैदराबाद येथे विमानातून स्वतःच्या पायाने उतरण्यास सक्षम ठरली. या प्रसंगामुळे विमानातील संपूर्ण प्रवासी आणि कर्मचारी भारावून गेले. इंडिगोच्या क्रू आणि संबंधित महिलेच्या पतीने डॉ. सिमरनकौर वधवा यांचे आभार मानले. इंडिगो एअरलाईन्सने देखील त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून या घटनेचे वर्णन करत डॉ. वधवा यांच्या कार्याचे जाहीर कौतुक केले.
डॉ. सिमरनकौर वधवा या सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा यांची पत्नी आहेत. कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून सेवा कार्य केले आहे.