टाळ-मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष; बाल वारकऱ्यांनी वेधले लक्ष
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या संत परंपरेचा जागर करुन ग्रीन स्पार्क स्कूलची आषाढी एकादशीनिमित्त दिंडी रंगली. दिंडीत श्री विठ्ठल रुख्मिणी, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, सोपानदेव, नामदेव, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा यांच्या वेशभूषेत असलेल्या दिंडीतील चिमुकल्यांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधले. बाल वारकऱ्यांच्या दिंडीने विठूरायाचा गजर केला.
शाळेच्या संस्थापिका प्रा. हेमलता पाटील व शिक्षिका वैशाली वायभासे यांच्या मार्गदर्शनाखाली सारसनगर भागातून ही दिंडी काढण्यात आली होती. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठू नामाच्या जय घोषात, पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थी उत्स्फूर्तपणे दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीत विद्यार्थ्यांसह पालकांचा देखील उत्साह दिसून आला.
दीपक जाजू व रती जाजू यांनी बाल दिंडीचे स्वागत करुन बाल वारकऱ्यांना खाऊचे वाटप केले. विठ्ठलाची वेशभूषा साकारलेल्या देवांश गाडळकर याने वारकरी सांप्रदायाने बंधूभाव व समानतेची शिकवण दिली असून, सर्व जाती-धर्माला बरोबर घेऊन चालण्याचा संदेश दिला. सिया कासार हिने रखुमाईची भूमिका साकारली तर राजनंदिनी जाजू, केशवी पवार, सेजल गायकवाड, हर्षित महाजन, साई रक्ताटे, शिवेंद्र बोरकर या मुलानी बाल संतांची रूपे साकारली होती.