सांस्कृतिक कार्यक्रमातून चिमुकल्यांनी जिंकली मने
मुलांवर हिंदू संस्कृतीप्रमाणे संस्कार रुजवावे -आ. संग्राम जगताप
नगर (प्रतिनिधी)- तपोवन रोड, कजबे मळा येथील जेनियस ग्लोबल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. पूर्व प्राथमिक व प्राथमिक च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्याविष्कारातून उपस्थितांची मने जिंकली. शाळेच्या आवारात झालेल्या स्नेहसंमेलनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्रासह विविध राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविले. कोळी नृत्य व महाराष्ट्रातील लावणी सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली. हिंदी-मराठी गीतांवर वैयक्तिक व समुह नृत्याचे बहारदार सादरीकरण करण्यात आले.

आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्नेहसंमेलाप्रसंगी यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळ फिल्ड ऑफिसर रविराज पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे दक्षिण जिल्हाध्यक्ष इंजि. डी.आर. शेंडगे, जेनियस एज्युकेशनचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, सहसंचालक महेंद्र म्हसे, पूजाताई कजबे, शोभाताई दातीर, बाळासाहेब कजबे, पांडुरंग गवळी, सानप सर, राहुल कजबे, शांताराम कजबे, अक्षय कजबे, जगदीश देशमुख, स्वाती डोमकावळे, प्रकाश डोमकावळे आदींसह मोठ्या संख्येने पालक, परिसरातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत मुलांमध्ये संस्काराची रुजवण करुन त्यांच्या भविष्याचा पाया रचला जातो. मुलांचा बौध्दिक विकास लहानपणी झाल्यास भविष्यात ही मुले पुढे जातात. इंग्रजी भाषेचे ज्ञान देतांना मुलांवर हिंदू संस्कृतीप्रमाणे संस्कार रुजविण्याचे त्यांनी आवाहन केले. रविराज पाटील यांनी विविध प्रदुषणांमुळे मानवी, प्राणी आणि वस्पतीचे जीवन धोक्यात आले असल्याचे स्पष्ट करुन, विद्यार्थ्यांना प्रदुषणाचे दुष्परिणाम सांगितले. तर प्रदुषणावर सनियंत्रण मिळवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
जेनियस ग्लोबल स्कूलचे सहसंचालक महेंद्र म्हसे यांनी या इंग्रजी माध्यमाच्या स्कूल मध्ये होणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली यावेळी कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व माता पालकाचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गुण गौरव करण्यात आला. बाळासाहेब शेंडगे यांनी शाळेच्या विविध उपक्रमाची देऊन, वार्षिक अहवाल सादर केला. तर शाळेचा वाढता गुणवत्तेचा आलेख मांडला.
विविध हिंदी-मराठी गीतांवर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. विविध गीतांवर रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी डोमकावळे व ज्योती म्हसे यांनी केले. महेंद्र म्हसे यांनी आभार मानले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी स्कूलच्या समन्वयक ज्योती म्हसे, उषाताई शेंडगे, अश्विनी शेंडगे, उषा मसुरे, ज्योती शिंदे यांनी परिश्रम घेतले.