92 टक्के मतदान होऊन निवडून आलेल्या प्रतिनिधींचे मंत्रिमंडळ स्थापन
विद्यार्थ्यांच्या बोटावर लागली मतदानाचा हक्क बजावल्याची शाई
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाही सुदृढ करायची असेल तर निवडणूक स्वच्छ व पारदर्शक होण्याची गरज असते. त्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाहीचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयात निवडणुक प्रक्रिया राबवून शालेय मंत्रिमंडळ निवडण्यात आले. यामध्ये उमेदवारी अर्ज भरणे, अर्जाची छाननी, अर्ज माघार घेणे, चिन्ह वाटप करणे व प्रचार करणे प्रत्यक्ष मतदानाचे सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडल्या. शाळेत 92 टक्के मतदान होऊन उमेदवार निवडण्यात आले. यामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी मतदान केले.

शालेय शिक्षणात नागरिकशास्त्र शिकवले जातात पण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून नागरिकशास्त्र शिकण्याचा यशस्वी प्रयोग लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत करण्यात आला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी शाळेच्या निवडणुकीतून आपले प्रतिनिधी निवडले व ही निवडणूक प्रक्रिया पार पडून नवनियुक्त मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा शाळेत पार पडला.
विद्यार्थ्यांमध्ये राजकारणाबाबत निर्माण झालेली उत्सुकता, विद्यार्थ्यांना लोकशाहीचा अर्थ समजून मतदानाच्या हक्काचे प्रबोधन व्हावे याकरिता शाळेत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणुकीतील उमेदवारांनी शाळेत प्रचार सभा घेऊन निवडून आल्यास शाळेच्या विकासात्मक कार्यासाठी काय योगदान देणार हे देखील स्पष्ट केले. नियोजनबद्ध पद्धतीने उमेदवारांनी निवडणुकीचा प्रचार केला. दहावीच्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची मतदार यादी बनवून मतदान घेण्यात आले. मतदान करताना विद्यार्थी व शिक्षकांची स्वाक्षरी घेऊन विद्यार्थ्यांच्या बोटावर शाई लावण्यात आली. बॅलेट पेपरद्वारे मतदान करुन विद्यार्थ्यांनी निवडणुकांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन मतदानाचा हक्क बजावला.

एकूण 13 उमेदवार रिंगणात होते. मतदान संपल्यानंतर लगेचच मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत तेजस थोरात सर्वाधिक मतांनी निवडून आला. तसेच अनुक्रमे स्नेहा काकडे, अजिंक्य पगारे, स्वराज्य एकशिंगे, स्वराज दळवी, श्रेयश घालमे, साक्षी खरात या निवडून आलेल्या प्रतिनिधींचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
केंद्रप्रमुख म्हणून मयूर पवार यांनी तर मतदान अधिकारी म्हणून श्रेया गोटे, गौरी सपाटे, कीर्ती गोलवड यांनी काम पाहिले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वर्गशिक्षक अमित धामणे यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रियेनंतर मतपेट्या जमा करुन विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक महत्त्व मुलांना पटवून सांगण्यात आले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली. निवडलेल्या प्रतिनिधीमधून मंत्रिमंडळाची नियुक्ती करण्यात आली. निवडणुक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी प्रदीप पालवे व मंगेश कारखिले या शिक्षकांचे सहकार्य लाभले.