विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा, संशोधनवृत्तीचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उत्कृष्ट आविष्कार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या 53 व्या विज्ञान, गणित व बाल वैज्ञानिक प्रदर्शनीचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला श्रीराम थोरात, श्री कवळे, मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण, राज्य गणित अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष संजयकुमार निक्रड, विष्णू मगर, जिल्हाध्यक्ष नवनाथ घुले, तसेच शहर विज्ञान व गणित अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रदर्शनीत शहरातील तसेच परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या कल्पकतेचा, संशोधनवृत्तीचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उत्कृष्ट आविष्कार सादर केला. प्रदर्शनीत विज्ञान, गणित, पर्यावरण, तंत्रज्ञान, आरोग्य, ऊर्जा संवर्धन, कृषी व सामाजिक उपयोजन अशा विविध विषयांवर आधारित मॉडेल्स, प्रयोग व प्रकल्प मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, सर्जनशील मांडणी व समस्यांवर सुचविलेले उपाय पाहून उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
समारोप कार्यक्रमात परीक्षकांनी उत्कृष्ट प्रकल्पांची निवड करून विजेत्या संघांना प्रमाणपत्रे व बक्षिसे प्रदान केली. या वेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा व नवोपक्रमाची भावना जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून भविष्यातील संशोधनासाठी प्रेरणा मिळते, असे मत श्रीराम थोरात यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.
