आमदार टिळेकर यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नाचे अहिल्यानगर संत सावता क्रांती परिषदेच्या वतीने स्वागत
नगर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र अरण येथे येणाऱ्या विठ्ठलाच्या पालखीचे नियोजन पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने करावे आणि सर्व सुविधा देण्याच्या मागणीसाठी पावसाळी अधिवेशनात आमदार योगेश (आण्णा) टिळेकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल अहिल्यानगर संत सावता क्रांती परिषदेच्या वतीने टिळेकर यांचे गणेश बनकर, राजेंद्र रासकर, उमेश साखरे, अतुल नेवसे, माजी सरपंच बंटी साबळे, बाळासाहेब बारवकर, नानाभाऊ गाडीळकर, रामदास नवले, अविनाश शिंदे आदींनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करुन आभार मानले आहेत.
संत सावता क्रांती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार टिळेकर यांनी थेट अधिवेशनात देव आणि संत भेटीच्या या महान पर्वकाळाला पालखीला सुविधा मिळवून देण्यासाठी आवाज उठवला आहे, गेली अनेक वर्ष प्रलंबित प्रश्नावर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मंदिरे समिती पंढरपूरचे मुख्याधिकारी राजेंद्र शेळके यांनी तातडीने बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
यामुळे यावर्षीपासून सदर पालखी सोहळा हा मंदिरे समितीच्या सर्व सोयी सुविधा आणि नियोजनात निघेल अशी अपेक्षा महाराष्ट्रातील भाविकांना आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. संप्रदायाच्या मांदियाळीतील आणि संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांच्या प्रभावळीतील अतिशय महत्वाचे संत म्हणून ओळख असलेले संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मळ्यात तीर्थक्षेत्र अरण येते. तेथे साक्षात पांडुरंग यायचे, देव त्यांना खुरपू लागायचे, अश्या पांडुरंगाला सावता महाराजांनी आपल्या हृदयात साठवले होते. त्यांनी कर्माचा सिद्धांत जगाला देताना आपल्या मळ्यातील कांदा, मूळा, भाजीमध्येच पांडुरंग पाहिला, त्यांची ही भक्ती पाहून पांडुरंग आपल्या भक्ताची वारी करू लागला, तेव्हा पासून महाराष्ट्रातील सकल संताच्या पालख्या देवाकडे जातात, परंतु पांडुरंगाची पालखी मात्र संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अरण तीर्थक्षेत्रावर दरवर्षी येते, असे महान अधिकारी संत म्हणून सावता महाराज यांचा उल्लेख होतो.
सदर पालखी ही पंढरपूर येथून काशी कापडी समजाच्या मठातून निघून अरण येथे जात असायची. परंतु संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट अरण आणि भक्त परिवार यांचे वतीने अध्यक्ष सावता महाराज वसेकर, रविकांत महाराज वसेकर, प्रभू महाराज माळी, अमर हजारे, आबा खारे, माऊली हळवनकर, हरीभाऊ गावंधरे, प्रशांत माळी, गणेश माळी यांनी फरताळे मठात पत्रकार परिषद घेऊन, पालखी नियोजन हे विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने करावे आणि या पालखी सोहळ्याला सर्व सुविधा द्याव्यात अशी मागणी केली होती. सदर मागणीची दखल घेऊन आमदार टिळेकर यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल संत सावता क्रांती परिषद अहिल्यानगर जिल्हा यांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहे.
