• Sat. Mar 15th, 2025

शिक्षक, शिक्षकेतरांना मार्च 2024 आखेर पर्यंतच्या पी.एफ. च्या पावत्यासह पुरवणी व वैद्यकीय देयके मिळावी

ByMirror

Feb 26, 2025

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचे प्रस्ताव मंजूर करा -बाबासाहेब बोडखे

शिक्षक परिषदेचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांना सन 2021-22 पासून ते मार्च 2024 च्या पी.एफ. च्या पावत्या मिळाव्या, सर्व प्रकारची पुरवणी व वैद्यकीय देयके द्यावी आणि प्रलंबित असणारे वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचे प्रस्ताव मंजूर करण्याच्या मागणीचे निवेदन माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना देण्यात आले.


शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन सदर प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी वैभव शिंदे, सुदेश छजलाने, सुन्ने सर, नूतन गाडे आदींसह शिक्षक वर्ग उपस्थित होते.


जिल्ह्यातील सर्व विद्यालयांना सन 2021-22 सालापर्यंत भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या मिळालेल्या आहेत. तसेच सन 2021-22 प्रमाणे सर्व विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते विशेष कॅम्पद्वारे ऑनलाईन अपडेट करण्यात आलेले आहेत. परंतु त्यापुढील वर्षाच्या भविष्य निर्वाह निधीचे कोणालाही ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्लिफा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यातून कर्ज काढायचे असल्यास सन 2021-22 सालापर्यंतचे शिल्लक रकमेवर कर्ज मंजूर केले जाते. पुढील दोन वर्षांचा हिशोब धरला जात नसल्याचे अनेक कर्मचारी तक्रार करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


मार्च 2024 अखेरच्या स्लिपा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने विशेष कॅम्प आयोजित करून तात्काळ सर्व कर्मचाऱ्यांना मिळाव्या, जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षेतर कर्मचाऱ्यांचे सर्व प्रकारचे पुरवणी देयके, वैद्यकीय देयके व मुख्याध्यापक शिक्षकेतर (सेवानिवृत्त) यांचे रजा रोखीकरणाचे देयके लवकरात लवकर द्यावे आणि प्रलंबित असणारे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणीचे प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *