शिक्षकांना तणाव व्यवस्थापन, भावनिक सक्षमीकरण व पोस्को काद्याबद्दल मार्गदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग युथच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दहा शिक्षकांना रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तर शिक्षकांना तणाव व्यवस्थापन, भावनिक सक्षमीकरण व पोक्सो काद्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
हॉटेल संजोग येथे सीएसआरडी महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुरेश पठारे व रोटरी लिटरसी चे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर दादासाहेब करंजुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग युथच्या अध्यक्षा स्विटी पंजाबी, सचिव डॉ. बिंदू शिरसाठ, प्रकल्प समनवयक सविता चड्डा, जागृती ओबेरॉय, शीलू मक्कर आदींसह शिक्षक वर्ग उपस्थित होते.
ॲड. अभय राजे यांनी पोस्को कायदा आणि युवक संरक्षण धोरण यावर चर्चा करुन शिक्षकांना पोस्को कायद्याची व्याप्ती सांगितली. बबिता जग्गी यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करताना तणाव व्यवस्थापन आणि भावनिक सक्षमीकरण या विषयांवर मार्गदर्शन केले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात समर्पित भावनेने उत्कृष्ट कार्य करणारे मनीषा बोर्डे, सुरेखा गर्जे, बाबासाहेब शिंदे, चंद्रकांत डाके, सुनील पंडित, प्रणव गांधी, क्रांती मुंडणकर, उमेश दोडेजा, लाजरस केदारी आणि महादेव राऊत यांना नेशन बिल्डर अवॉर्डने गौरविण्यात आले. गुणवंत विद्यार्थी घडविणे, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, कॅन्सर जागृती, स्किल डेव्हलपमेंट आदींसह शैक्षणिक, सामाजिक, कला व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
या कार्यक्रमात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे गौरव करणारे मनीषा बोर्डे यांच्या हस्तलेखनाच्या कॅलिग्राफीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच शिक्षकांसाठी यावेळी मनोरंजनात्मक उपक्रम घेण्यात आले. रोटरीच्या विविध सामाजिक उपक्रमात या शिक्षक वर्गाचा नेहमीच सहभाग मिळत असल्याबद्दल त्यांचे आभार माणून त्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
