शिक्षकांप्रती आदर व्यक्त करुन विद्यार्थ्यांचे गुरुवंदन
शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा दीपस्तंभ -अनिता काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वसामान्य घटकातील विद्यार्थी घडविण्याचे काम करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे, शिक्षिका सुरेखा वाघ व शितल आवारे यांना सन्मानित करण्यात आले.
मुख्याध्यापिका अनिता काळे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दिन पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना जीवनात शिक्षकाचे महत्त्व सांगण्यात आले. पालकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शिक्षकांचा सत्कार केला. मुलांनी शिक्षकांप्रती आदर व्यक्त करुन गुरुवंदन केले. डॉ. अनिल आठरे पाटील, माजी नगरसेविका दिपाली बारस्कर, बाळासाहेब बारस्कर, शारदाताई ढवण यांनी यांनी शाळेला भेट देऊन शिक्षकांचा सत्कार केला. नागेबाबा पतसंस्थेच्या वतीने शिक्षकांना पुस्तकांची भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

अनिता काळे म्हणाल्या की, शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा दीपस्तंभ होय. शिक्षकांशिवाय जीवनात प्रगती करणे अशक्य आहे. अनेक महान व्यक्ती शिक्षकांमुळे घडले आहेत. मुलांमध्ये संस्कार रुजवून समाज घडविण्याचे कार्य शिक्षक करत आहे. राष्ट्र उभारणीचे कार्य शाळांमधून होत आहे. शिक्षकांच्या माध्यमातून सशक्त भारताचे भवितव्य घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बांगर या विद्यार्थ्याने शाळेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तर वेदांत घुले याने घड्याळ भेट दिली. युवराज रहाटळ, प्रसाद कदम, रितीका चौथे, समर्थ कानडे, प्रतिक्षा जाधव या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली.
