महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या हस्ते झाला गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षिका तथा कवियत्री विद्या रामभाऊ भडके यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शहरात झालेल्या माळी समाजाच्या वधू-वर मेळाव्यात भडके यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रयत प्रतिष्ठान, जय युवा अकॅडमी, माळी महासंघ, श्री संत सावता माळी युवक संघ, फिनिक्स फाउंडेशन, जनवार्ता आणि समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोपट बनकर, ॲड. महेश शिंदे, मंगल भुजबळ, ॲड. सुनिल तोडकर, प्रा. सिताराम जाधव, गणेश बनकर, जयश्री शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
नागरदेवळे येथील रहिवासी असलेल्या भडके या बोधेगाव (ता. शेवगाव) येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्यांचे सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य सुरु आहे. शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांनी उपक्रमशील शिक्षिका म्हणून ओळख निर्माण केली आहे. तर उडे तुफान काळजात या काव्यसंग्रहाच्या रूपाने साहित्य क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना पाच राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक गोसावी सर, पर्यवेक्षक मोरे सर, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, शर्मिला गोसावी, अनिल धाडगे, संजय भडके, भाऊसाहेब पानमळकर यांच्यासह सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
