• Sat. Mar 15th, 2025

बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच शिक्षकाला धमकी; पेपरच्या वेळेत शिक्षकाला चाकूचा धाक

ByMirror

Feb 12, 2025

शिक्षकांना परीक्षा काळात संरक्षण देण्याची माध्यमिक शिक्षक संघटनेची मागणी

अन्यथा बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला जाणार -आप्पासाहेब शिंदे

नगर (प्रतिनिधी)- बारावीच्या बोर्ड परीक्षांना प्रारंभ झाले असून, यामध्ये पहिल्याच पेपरदरम्यान मंगळवारी (दि.11 फेब्रुवारी) एक गंभीर घटना घडली आहे. श्री वृद्धेश्‍वर हायस्कूल, तिसगाव (ता. पाथर्डी) येथे एक गुंडाने पर्यवेक्षकाला चाकूचा धाक दाखवून दमदाटी केली आहे. या घटनेचा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने निषेध नोंदवून, जबाबदारीवर असलेल्या शिक्षकांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घेण्याची मागणी करण्यात आली आहे.


यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने पाथर्डीचे तहसीलदार उध्दव नाईक व पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर संतोष मुटकुळे यांना निवेदन दिले. यावेळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, अशोक दौंड, डी.सी. फकीर, सुभाष भागवत, भारत गाडेकर, आसिफ पठाण, महिंद्र राजगुरू, आत्माराम दहिफळे, बापूसाहेब कल्हापूरे, एस.आर. पालवे, व्ही.व्ही. इंगळे, सुभाष भागवत, अजय भंडारी, समाधान आराक, सुरेश मिसाळ, छबुराव फुंदे, सी.एम. कर्डिले, एन.एस. मुथा, मच्छिंद्र बाचकर, सुधाकर सातपुते, डॉ. अनिल पानखडे, अजय शिरसाठ, व्ही.पी. गांधी आदी उपस्थित होते.


बारावी बोर्डाच्या पहिल्याच पेपरला शिक्षकांना धमकाविण्याचा प्रकार घडला असताना, शिक्षिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. पेपर संपल्यानंतर काही गुंडांनी पेपर जमा करणाऱ्या शिक्षकाची गाडी अडवून त्यांना गाडीच्या बाहेर ओढून शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हंटले आहे.


यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षकांची सरमिसळ पद्धतीने नियुक्ती केली आहे. त्यामुळे ओळख नसलेल्या आणि दूरवर असलेल्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेने शासनाकडे शिक्षकांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच, अशा घटना सातत्याने घडत राहिल्यास, इयत्ता, दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.


सरमिसळ पद्धतीने अनोळखी शाळेत शिक्षक परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी जात आहे. तेथील परिस्थिती व ओळख नसल्याने गाव गुंडांकडून त्यांना धमकाविण्याचे प्रकार घडत आहे. अशा प्रकारामुळे शिक्षकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, काही गंभीर प्रकार घडण्या अगोदरच प्रशासनाने त्यांना संरक्षण द्यावे. अन्यथा बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला जाणार आहे. – आप्पासाहेब शिंदे (अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघटना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *