म. रा. शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्यास यश
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय स्तरावर शिक्षक नेमणूकी करीता प्रत्येक वर्षी शाळांची संच मान्यता करून पदे निश्चीत केली जातात.२०१४ पासून निकषात बदल होऊन तुकडीवर आधारीत शिक्षक निश्चिती रद्द करून स्तरानुसार वेगवेगळी संच मान्यता होऊ लागल्याने व २०१५ पासून शारीरिक शिक्षकांचा विशेष शिक्षकाचा दर्जा काढून ६ ते ८ या उच्च प्राथमिकला वर्गीकृत करण्यात आल्याने कार्यभार बसत नसल्याने पद भरतीत शारीरिक शिक्षक डावलला जाऊ लागला. त्यामुळे २०१९ च्या शिक्षक भरतीत ०.०१% टक्केच शारीरिक शिक्षकांची पद भरती होऊ शकली होती व चालू भरतीत देखील ३६ जागांच्या आसपास उच्च माध्यमिक पर्यंतच्या अतिशय नगण्य जागेची जाहिरात पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. मात्र शासनाने नुकत्याच निर्गमित केलेल्या शासन निर्णयात संच मान्यतेच्या निकषात सकारात्मक बदल केल्याने पुढील भरतीपासून शारीरिक शिक्षकांची पदे वाढली जाणार असल्याने पदवीधारकांत व संघटनेत उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर, म. रा. शारीरिक शिक्षण समन्वय समिती, म. रा. शारीरिक शिक्षण महामंडळ अमरावती , म. रा.युवा शारीरिक शिक्षक संघटनांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे संच मान्यतेच्या निकषात शासनाने सकारात्मक बदल केल्याने शारीरिक शिक्षकां बरोबर कला शिक्षकही नोकर भरतीत तब्बल ९ वर्षांनी भरला जाणार असल्याने पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
बायफोकल पद्धतीने शारीरिक शिक्षक भरती
शारीरिक शिक्षण या विषयाचा शिक्षक नियुक्त करताना पूर्णवेळ शिक्षकाच्या किमान ५० टक्के कार्यभार शारीरिक शिक्षणाचा राहिल व ५० टक्के कार्यभार हा पदवी स्तरावरील अध्यापन विषयाचा राहिल. पूर्ण कार्यभारासाठी ६ वी ते १० वी चा कार्यभार धरून बायफोकल पद्धतीने पदभरती होणार आहे.
विशेष शिक्षकाचा दर्जा पुन्हा बहाल
पूर्वी शारीरिक शिक्षक हा विशेष शिक्षकात म्हणून गणला जात असे. २०१५ मध्ये विशेष शिक्षकाचा दर्जा काढून घेतला होता.नवीन निकषात शासनाने विशेष शिक्षकाचा दर्जा पुन्हा बहाल केला आहे.
६ वी ते १० वी असा कार्यभार धरणार
पूर्वी ६ वी ते १० वी वर्गांचा कार्यभार धरून तुकडीवर आधारीत शिक्षक निर्धारण होत असे. २०१५ नंतर इयत्ता ९ वी १० वी या माध्यमिक स्तराचाच कार्यभार धरून शारीरिक शिक्षक पदभरती होऊ लागली . त्यामुळे नोकरभरतीत शारीरिक शिक्षक हा ९ वी १० वीला जादा तुकडया असणाऱ्या शाळे पुरताच मर्यादित राहिला. नवीन निकषा नुसार १ ली ते १० वी शाळांना २५१ विद्यार्थी संख्येला तर इ. ८ वी ते १० वी शाळांना १५१ विद्यार्थी संख्येला पहिले पद देय केले आहे.
कमी पटसंख्येच्या शाळांनाही मिळणार शारीरिक शिक्षक
ज्या शाळांचा कार्यभारा अभावी विशेष शिक्षक मंजुर होत नसेल तर नजिकच्या शाळांचे विशेष शिक्षकांचे मॅपिंग करून शारीरिक शिक्षक दिला जाणार आहे.
प्राथमिकपासून विद्यार्थी गिरवणार शारीरिक शिक्षणाचे धडे
या शासन निर्णयाने प्राथमिक शाळांना केंद्र स्तरावर असणाऱ्या सर्व शाळांना मिळून एक शारीरिक शिक्षक पद मंजुर करण्यात आल्याने अनेक वर्षांपासूनची प्रतिक्षा संपली असून प्राथमिकपासून शारीरिक शिक्षणाचा पाया पक्का होणार आहे.
जास्त विद्यार्थी संख्येच्या शाळांची अडचण
ज्या शाळांमध्ये ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आहे अशा शाळांमध्ये दुसरा शारीरिक शिक्षक ७५१ , तिसरा १२५१ ला मंजुर होणार असल्याने तेथील शारीरिक शिक्षणाचा लोड एकट्या शिक्षकाला पार पाडावा लागणार आहे, अशा शाळांची संचमान्यतेत अडचण झाली आहे. या करीता संघटना शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
संच मान्यतेत पद पुन्हा समाविष्ट व्हावे म्हणून गेली सात वर्षे राज्य संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, सचिव विश्वनाथ पाटोळे, शिवदत्त ढवळे, ज्ञानेश काळे, डॉ अरुण खोडस्कर, पुरुषोत्तम उपर्वट, सुवर्णाताई पाठक, डॉ.आनंद पवार, राजेश जाधव, प्रितम टेकाडे, लक्ष्मण बेल्लाळे, घनःशाम सानप, विलास घोगरे, बी. डी जाधव, कैलास माने, डॉ जितेंद्र लिंबकर, तायप्पा शेंडगे, डॉ.मयुर ठाकरे, राजेंद्र कदम, संजय पाटील, डॉ. नितीन चवाळे, सचिन देशमुख, सुनिल सुर्यवंशी, सचिन गायकवाड, संजय मैंद, अमोल जोशी, प्रमोद पाटील, उत्तमराव जावळे, बयाजी बुराण, गोकुळ यादव, सुनिल सुर्यवंशी, श्रीकांत देशमुख, भाऊसाहेब बेंद्रे, महेंद्र हिंगे, नंदकुमार शितोळे, नामदेव पवार, अविनाश बारगुजे, मोहन पाटील, निलेश भगत, उमेश कडू, संजय सुकाळकर, संदिप इंगोले, महेश अलोने, जालिंदर आवारी आदींनी शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव, शिक्षणराज्यमंत्री, शिक्षणमंत्री यांचेकडे शिक्षक व पदवीधर आमदार व मंत्री महोदयांचे माध्यमातून प्रयत्न केले होते. ९ वर्षांनी कला-क्रीडा-कार्यानुभव शिक्षकांची भरती होणार असल्याने संघटनेच्या वतीने पत्रक प्रसिद्ध करून शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.
संचमान्यतेचे बदललेले निकष, संचमान्यतेसाठी शाळांचे करण्यात आलेले १ ते ५, ६ ते ८ व ९ वी १० चे गट व गटानुसार होणारी संचमान्यता निर्धारण यामुळे माध्यमिक ९ वी १० वी स्तरावर शारीरिक शिक्षकाचा कार्यभार बसू शकत नसल्याने पदभरती अत्यल्प प्रमाणात होत होती. सर्व संघटनांच्या एकत्रित प्रयत्नातून शासनाने सकारात्मक बदल केल्याने शारीरिक शिक्षक व्यवस्थेत पुन्हा घेतल्याने शासनाचे मनःपूर्वक धन्यवाद. -राजेंद्र कोतकर (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ)
