गजराजनगर येथील मागासवर्गीय युवकावर जीवघेणा हल्ला; फरार आरोपींना अटक करण्याची मागणी
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे एमआयडीसी पोलीस स्टेशनला निवेदन
नगर (प्रतिनिधी)- गजराज नगर येथील मागासवर्गीय युवकावर जुन्या वादातून जीवघेणा हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करुन त्या मागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन या गुंड प्रवृत्तीच्या टोळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी सूर्यवंशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबलू सूर्यवंशी, भाऊसाहेब आल्हाट, बबलू सूर्यवंशी, सुरज कांबळे, अक्षय कांबळे, अभिजीत माने, मोहन जठाडे, छावा शिरसाठ, भागवत शिंदे, शाम शिंदे आदी उपस्थित होते.
गजराज नगर येथील आकाश राजेंद्र कांबळे या युवकास 21 जुलै रोजी गजराज नगर छत्रपती संभाजीनगर रोडवर जमाव गोळा करुन मारहाण करण्यात आली. यामध्ये किरण मांजरे, अक्षय शिरसाठ, सागर पवार, महेश उर्फ अन्नु गुंजाळ, अविनाश कालू डुकरे, आकाश अनिल डुकरे, रोहन गायकवाड यांच्यासोबत असलेल्या इतर काही युवकांनी कोयते, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. यामध्ये कांबळे रक्तबंबाळ होवून गंभीर जखमी झाले असून, त्याची प्रकृती गंभीर असून उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मारहाण करणाऱ्या टोळीतील व्यक्तींवर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून, ते सातत्याने गजराजनगर व शेंडी-पोखर्डी परिसरात दहशत निर्माण करुन गुंडगिरी करत आहे. या मधील चार आरोपी अटक असून, इतर आरोपी फरार आहेत. यामधील सर्व आरोपींना अटक करावी, त्यांच्या गुन्हेगारी टोळीवर कठोर कारवाई करावी, या घटनेचा मास्टर मार्इंड शोधावा व या गुन्ह्यात ॲट्रोसिटी ॲक्टचे वाढीव कलम लावण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.