नागरिकांच्या जिल्हाधिकारी यांना निवेदन; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमदार जगताप यांना लक्ष घालण्याची मागणी
टोळीचे शहरात अनेक अवैध धंदे असल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- शहरात गुन्हेगारी करुन अवैध धंदे चालविण्यासाठी उदयास आलेल्या पी.पी. कंपनी टोळीवर संघटित गुन्हेगारी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी नालेगाव मुन्सिपल कॉलनी येथील नागरिकांच्या वतीने जितेंद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या टोळीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असताना, जिल्हा व पोलीस प्रशासनाकडे कारवाईसाठी पाठपुरावा करण्याचे निवेदनही आमदार संग्राम जगताप यांना देण्यात आले.
आमदार जगताप यांनी शहरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळीच्या बंदोबस्तासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. दिल्लीगेट येथील नालेगाव म्युन्सिपल कॉलनीतील एका कुटुंबातील गुंड ही टोळी चालवत आहे. त्यांचे गावठी दारू, जुगारचे क्लब आणि गांजा विक्रीचे व्यवसाय आहे. या टोळीत अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा समावेश करुन परिसरासह शहरात दहशत पसरवून गुंडगिरी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या टोळी मधील गुन्हेगारांच्या विरोधात जो कोणी पोलिसात तक्रार करेल? त्याला दमदाटी करुन मारहाण केली जात आहे. यावरही कोणी विरोध दर्शविला, तर त्याच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. पोलीस प्रशासनाकडे तक्रारी व अर्ज करुनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे या गुन्हेगारी टोळीची दहशत वाढली आहे. पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी त्यांना साथ देत आहे. पी.पी. कंपनीच्या साथीदारांनी पाच ते सहा महिन्यांपूर्वी बेकायदेशीरपणे कोट्यावधी रुपये आणले असून, त्यांनी त्या पैशातून संपूर्ण शहर शहरात बिंगो, मटका, पत्ते क्लब, गांजा विक्री यासारखे बेकायदेशीर धंदे सुरु केले आहे. बेकायदेशीरपणे सावकारी करुन व्याजाने पैसे देणे आणि मालमत्ता खरेदी करण्याचे भागीदारीत व्यवसाय चालू केले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या टोळीतील व्यक्तींवर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पी.पी. कंपनीचे हस्तक, साथीदार व त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर संघटित गुन्हेगारी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई व्हावी, या टोळीला मदत करणाऱ्या पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने जितेंद्र चव्हाण यांनी केली आहे.