अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी
अवैध गौणखनिजाचे पंचनामा करण्याचे आदेश होवूनही कारवाईबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई; दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निंबळक येथील गट नंबर 217/1 मधील अवैध गौणखनिज बाबत पंचनामा आदेश होवूनही दंडात्मक कारवाईबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या मंडळाधिकारी व तलाठी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाई व्हावी व मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करुन भर टाकणाऱ्या दोषीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
नगर तालुक्यातील निंबळक येथील गट नंबर 217/1 क्षेत्रात अवैधरित्या करण्यात आलेल्या गौण खनिज उत्खननाची मोठ्या प्रमाणात भर टाकण्यात आलेली आहे. यामधील दोषी व्यक्तीने निंबळकचे मंडळाधिकारी व तलाठी यांच्याशी संगमत केल्याने त्याबाबत कुठलीही कारवाई आजाखेर करण्यात आलेली नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
या प्रकरणातील दोषी व्यक्तीने शासनाची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात कर बुडवला आहे. अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करुन भर टाकण्यात आल्याने सदरील दोषीवर महसूल अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व भर टाकण्यात आलेल्या जागेचे मोजमाप करून त्यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48 (7), महाराष्ट्रात जमीन महसूल (सुधारणा) नियम 2017 तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर प्रक्रियेबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई करून कर्तव्यात कसूर करणारे निंबळकचे मंडळाधिकारी व तलाठी यांच्यावर दप्तर दिरंगाई व शिस्तभंगाची कारवाई करण्याचे म्हंटले आहे.