• Thu. Oct 16th, 2025

पाण्याच्या कनेक्शनसाठी देहरे ग्रामस्थांचे एमआयडीसी कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण

ByMirror

Mar 21, 2024

एमआयडीसीने बूस्टर जल उदंचन केंद्र उभारताना पाइपलाइन देण्याचा दिलेला शब्द पाळावा -प्रा. दिपक जाधव

अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) गावात बूस्टर जल उदंचन केंद्र उभारताना एमआयाडीसीने दोन इंची पाइपलाइन कनेक्शन देण्याचा दिलेला शब्द पाळून गावाची तहान भागविण्यासाठी तातडीने पाइपलाइनद्वारे कनेक्शन देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी एमआयडीसी कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण केले.


देहरेचे उपसरपंच प्रा. दिपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपोषणात मार्केट कमिटीचे माजी संचालक संजय शिंदे, सोसायटीचे माजी चेअरमन रमेश काळे, उत्तम काळे, बबन करंडे, माजी सरपंच अब्दुल खान, सोसायटीचे संचालक भानुदास भगत, अविनाश खजिनदार आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.


देहरे येथे एमआयडीसीने बूस्टर जल उदंचन केंद्र उभारलेले आहे. हे केंद्र गावाच्या हद्दीत वन विभागाच्या जागेत उभारताना ग्रामपंचायतने एमआयडीसीला ना हरकत प्रमाणपत्र देवून गावासाठी पाइपलाइन कनेक्शन देण्याची बोलणी केली होती. यावर एमआयडीसीने त्यावेळी गावासाठी दोन इंची पाइपलाइन देण्याचा शब्द दिला होता. एमआयडीसीला देण्यात आलेल्या जागेवर ग्रामपंचायतीला गावाच्या विकासाच्या अनुषंगाने विविध योजनांच्या माध्यमातून शासकीय कार्यालय बांधकाम करावयाचे होते. तरी देखील तत्कालीन ग्रामपंचायतीने त्या जागेला नाहरकत दिली. सध्या गावात पाण्याचे मोठे संकट असून, गावातील पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी एमआयडीसीने शब्द दिलेल्या पाइपलाइनच्या कनेक्शनची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


ग्रामपंचायतीने एमआयडीसीकडे वारंवार लेखी व तोंडी मागणी करून देखील कनेक्शन देण्याची मागणी पूर्ण केली जात नाही. आश्‍वासन देवून देखील या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. गावाची गरज ओळखून तातडीने एमआयाडीसीने दोन इंची पाइपलाइन कनेक्शन देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा सर्व ग्रामस्थांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.



एमआयडीसीने बूस्टर जल उदंचन केंद्र उभारताना देहरे गावासाठी दिलेला दोन इंची पाइपलाइनद्वारे कनेक्शन देण्याचा दिलेला शब्द पाळावा. गावाला पाण्याची गरज असून, एमआयडीसीने आडमुठेपणाची भूमिका सोडावी. अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. -प्रा. दिपक जाधव (उपसरपंच, देहरे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *