पारंपारिक वाद्यांसह शहरातून निघाली शोभायात्रा
खानकाहमधून मानवतेचा संदेश -हजरत सय्यद मोहसीन
नगर (प्रतिनिधी)- लालटाकी येथील हजरत ख्वाजा सय्यद फकीर मोहंमद शाह चिश्ती (रहे.) दर्गाचा संदल-उरुस बज्म ए चिरागे फकीर चिश्ती इंटरनॅशनल (बी.सी.एफ.आय.) संस्थेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातून पारंपारिक वाद्यांसह भव्य शोभायात्रा काढण्यात आली. तर दर्गात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सज्जादा नशीन हजरत सय्यद मोहसीन अली शाह चिश्ती यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा पार पडला. शहरातून निघालेल्या शोभायात्रेत जिल्ह्यातील व दक्षिण आफ्रिका (कॅपटाऊन) येथून आलेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपारिक वाद्यांवर धार्मिक गीतांचे सादरीकरण, घोड्यांच्या रथात असलेली फुलांची चादर, मिरवणुकीतील विद्युत रोषणाई आकर्षण ठरली. लालटाकी येथून शोभा यात्रेला प्रारंभ झाले. सर्जेपुरा, कापड बाजार, दाळमंडई, झेंडीगेट, पीरशाह खुंट व पुन्हा सर्जेपुरा मार्गे लालटाकी येथे दर्गाच्या ठिकाणी शोभा यात्रेचा समारोप झाला. प्रार्थने नंतर दर्गाला संदल व फुलाची चादर अर्पण करण्यात आली. संदल उरुस निमित्त दर्गास आकर्षक फुलांची व विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली आहे.
संदल, उरुस निमित्त दुसऱ्या दिवशी भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. तर संध्याकाळी झालेल्या मुशायरा कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध झाले. रात्री दर्गा परिसरात झालेल्या महफिले समा कव्वाली कार्यक्रमाने भाविक भारावले. यावेळी उपस्थित कव्वाल यांनी सुफी गीतांचे बहारदार सादरीकरण केले.
हजरत फकीर मोहंमद शाह सहाब हे मोहंमद पैगंबर साहेबांचे वंशज असून, त्यांचे पुर्वज हजरत सय्यद आमिनुल मदनी हे मदीना शरीफ अरबस्तान येथून भारतात स्थायिक झाले. हजरत फकीर मो.शाह सहाब यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. त्यांनी पंचवीस वर्ष पीरशहाखुंट येथील मस्जीदमध्ये इमामत केली. झेंडीगेट येथे खानकाह मदरसेची स्थापना करुन, त्यांनी विद्यार्थ्यांना इस्लाम धर्माची शिकवण दिली. त्यांचे गुरु सय्यद हबीबअली शाह चिश्ती निजामी असून, त्यांची दर्गाह नामपल्ली (हैदराबाद) येथे आहे. हजरत फकीर मो.शाह सहाब यांनी सुफी पंथामधील चिश्तीया निजामी या परंपरेची दिक्षा सय्यद हबीबी अली शाह यांच्याकडून घेतली. या परंपरेचा प्रचार व प्रसार देशासह परदेशात केला गेला. ज्या प्रमाणे हजरत साहेबांनी अहमदनगर मध्ये खानकाह ची स्थापना केली, त्याप्रमाणे त्यांचे नातू हजात सय्यद मेहबुब अली शाह चिश्ती निजामी यांनी प्रभावीपणे देश-विदेशात खानकाची स्थापना केली. हे संदल उरुस धार्मिक एकतेचे प्रतिक असून, खानकाहमधून मानवतेचा संदेश देण्यात येतो. या सुफी-संतांच्या विचारांची जगाला गरज असल्याचे खानकाहचे व्यवस्थापन पहाणारे सज्जादा नशिन हजरत सय्यद मोहसीन अलीशाह सहाब यांनी सांगितले. संदल उरुसचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी.एस.एफ.आय. संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.