• Fri. Jan 9th, 2026

भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर जिल्हा सरचिटणीसपदी सुनिल सकट यांची नियुक्ती

ByMirror

Jan 9, 2026

शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण क्षेत्रात सातत्याने कार्य करणारे, तसेच महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुनिल सकट यांची भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या अहिल्यानगर शहर जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या दीर्घकालीन संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांना चौथ्यांदा ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


भाजपच्या अहिल्यानगर येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते सुनिल सकट यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शहर उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, माजी शहर जिल्हाध्यक्ष नरेश चव्हाण, सरचिटणीस महेश नामदे, अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर जिल्हा महिला अध्यक्षा मिराताई सरोदे, सरचिटणीस राजू घोरपडे, शहर उपाध्यक्ष संतोष शिरसाठ, शहर जिल्हा कोषाध्यक्ष राहुल जाधव, शहर जिल्हा चिटणीस अशोक भोसले, शहर जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव काते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


सुनिल सकट हे फुले, शाहु, साठे, आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते असून, ते भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठपणे कार्य करत आहेत. यापूर्वीही त्यांनी भाजपच्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी मृत्यूपश्चात देहदान व अवयवदानाचा संकल्प केला असून, समाजाला प्रेरणा देणारे असे कार्य ते सातत्याने करीत आहेत. तसेच महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी, राष्ट्रीय सण-उत्सव हे ते वृक्षारोपणाच्या माध्यमातून साजरे करतात. पर्यावरण संवर्धन व सामाजिक प्रबोधनाचा त्यांनी घेतलेला वसा लक्षात घेऊनच त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकण्यात आला आहे.


नियुक्तीनंतर बोलताना सुनिल सकट म्हणाले की, पक्षवाढीसाठी सदैव तत्पर राहून, पक्षाचे विचार व कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यात येणार आहे. भाजप सरकारच्या विविध जीवनदायी योजना, कल्याणकारी विकासाची विचारधारा व कार्य सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


ही नियुक्ती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या निवडीबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व उपाध्यक्ष ॲड. धनंजय जाधव यांनी सुनिल सकट यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *