अंतिम सामन्यात 4-2 ने इलाइट फुटबॉल क्लबवर मात; उत्कृष्ट खेळाडूंच्या चमकदार कामगिरीने स्पर्धेला रंगत
नवीन वर्षात विविध अनेक स्पर्धेचे आयोजन -मनोज वाळवेकर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे दिवंगत माजी सचिव गॉडविन डिक यांच्या स्मरणार्थ आयोजित गॉडविन कप फुटबॉल स्पर्धेचा रोमांचक अंतिम सामना सुमन इंटरप्रायजेस विरुद्ध इलाइट फुटबॉल क्लब यांच्यात खेळविण्यात आला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळकौशल्य दाखवत प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली. तुफानी गोलांचा पाऊस पाडत सुमन इंटरप्रायजेसने 4-2 अशा फरकाने विजय मिळवत गॉडविन कप 2025 वर आपले नाव कोरले.
सामन्याच्या पहिल्याच मिनिटापासून चुरस निर्माण झाली होती. गोलवर गोल करत दोन्ही संघांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.

सुमन इंटरप्रायजेसकडून प्रकाश कनोजीया 2 गोल, महेश पटेकर व नवीन याने प्रत्येकी 1 गोलने भक्कम आघाडी घेऊन विजय सुनिश्चित केला. इलाइट फुटबॉल क्लबकडून अथर्व सानप यांनी सलग 2 गोल करून सामना रंगतदार ठेवला.
उपांत्य सामन्यातील संघर्षही ठरला संस्मरणीय दुसऱ्या उपांत्य फेरीत इलाइट फुटबॉल क्लब व बाटा एफसी यांच्यातील लढत टायब्रेकरपर्यंत पोहोचली होती. तणावपूर्ण क्षणी शांतता राखत इलाइट संघाने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती.
स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिकांनी गौरविण्यात आले. यामध्ये साहिल कुसळकर (फिरोदिया शिवाजीयन्स), जैद शेख (गुलमोहर क्लब), प्रकाश कनोजीया (सुमन इंटरप्रायजेस), महेश पटेकर (सुमन इंटरप्रायजेस) यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून तर यश कोठाळे बेस्ट गोलकीपर (इलाइट फुटबॉल क्लब) म्हणून सन्मानित करण्यात आले.
या सर्व खेळाडूंना तसेच विजयी व उपविजयी संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व बक्षिसे देण्यात आली. यावेळी फुटबॉल असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, जोगासिंह मिनहास, सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव, विक्टर जोसेफ, खजिनदार रिशपालसिंग परमार, कॉलीन डिक, तपन सिंग, सदस्य व्हिक्टर जोसेफ, फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीच्या कोअर कमिटी सदस्य पल्लवी सैंदाणे, अभिषेक सोनवणे, श्रेया सागडे, जेव्हिअर स्वामी, राजेश अँथनी, सचिन पठारे, आदींसह खेळाडू उपस्थित होते.
फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीच्या वतीने, जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या अधिपत्याखाली तसेच डिक परिवाराच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या वर्षीच्या गॉडविन कपमध्ये जिल्ह्यातील 12 निवडक संघांनी सहभाग नोंदवला होता. तब्बल एक आठवडा फुटबॉलचा थरार सुरू होता. प्रेक्षकांनीही सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. संघांना रोख बक्षीस कॉलीन गॉडवीन डिक यांच्या वतीने देण्यात आले.
फुटबॉल असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर म्हणाले की, जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून खेळाडूंना विविध स्पर्धा व प्रशिक्षण शिबिरांद्वारे प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने केले जात असल्याचे स्पष्ट केले. सचिव रोनप फर्नांडिस यांनी आगामी काळातही अनेक स्पर्धा होणार असून, यासाठी सर्व खेळाडूंनी सीआरएस नोंदणी करण्याचे आवाहन केले. अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत संघांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीने परिश्रम घेतले.
