जिल्हा शल्य चिकित्सकांनी केस पेपरची वेळ सकाळी 8:30 ते दुपारी 1:00 पर्यंत करण्याचे दिले आश्वासन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी बुधवारी भेटणाऱ्या केस पेपरची वेळ सकाळी नऊ ते दोन वाजे पर्यंत वाढविण्याची मागणी भाजप दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांची भेट घेऊन या प्रश्नावर निवेदन दिले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. घोगरे यांनी तात्काळ या प्रश्नाची दखल घेऊन केस पेपरची वेळ बुधवार (दि.4 सप्टेंबर) पासून सकाळी 8:30 ते दुपारी 1:00 पर्यंत करण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन दिले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे, जिल्हा सचिव ईश्वर गुंड, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत काळे, महेश विभुते, नगर तालुकाध्यक्ष श्रीकांत काळे, सुरेश देवकर, कैलास शेलार, सरपंच प्रकाश घोरपडे, तालुका उपाध्यक्ष संदीप शेडकर, नगर शहराध्यक्ष गणेश लष्करे, नरेश न्यूती, संदीप शिंदे, प्रदीप वावरे आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.
जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी जिल्हा रुग्णालय मार्फत दिव्यांग प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी दिव्यांगांची तपासणी बुधवारी होत असते. जिल्हाभरातून वेगवेगळ्या स्वरूपाचे दिव्यांग जिल्हा रुग्णालयात येत असतात. प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असतात. सर्वात मोठा जिल्हा असल्याने कानाकोपऱ्यातून दिव्यांग बांधव येत असतात. काही दिव्यांगांना गाड्या भेटत नाही, तर काहींना शहरात येण्यास येण्यास उशीर होतो. केस पेपरची वेळ संपल्याने आलेल्या दिव्यांगांना माघारी फिरण्याची वेळ येते. यामुळे त्यांचा पैसा, वेळ व श्रम वाया जाते. तर त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. ज्या कामासाठी आले, ते काम न झाल्याने त्यांना पुन्हा बुधवारी शहरात येण्याची नामुष्की ओढावत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
केस पेपरची खिडकी लवकर बंद होत असल्याने दिव्यांगांची एकप्रकारे हेळसांड होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या दिव्यांगांना अपमानास्पद वागणूक न देता सन्मानाने वागणूक द्यावी, दिव्यांगांना जिल्हा रुग्णालयात आल्यावर सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्या, पुढील बुधवारपासून केस पेपर फक्त दिव्यांग व्यक्तींसाठी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत वाढवून देण्याची मागणी भाजप दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने करण्यात आली होती. जिल्हा शल्य चिकित्सकांनी तातडीने घेतलेल्या निर्णयाचे दिव्यांगांच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.