स्वरचित हिंदी कविता, लघुकथा सादरीकरण आणि निबंध स्पर्धेत पटकाविले बक्षिसे
विद्यार्थ्यांनी स्वत:ला ज्ञानाने सक्षम करुन स्पर्धेत उतरावे -किशोर मुनोत
अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंदी भाषा संवर्धनासाठी अहमदनगर महाविद्यालय हिंदी विभाग व डॉ. शंकर केशव आडकर चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वरचित हिंदी कविता, लघुकथा सादरीकरण स्पर्धेत तसेच टाटा बिल्डिंग इंडियाच्या वतीने पार पडलेल्या शालेय निबंध स्पर्धेत भुईकोट किल्ला येथील पंडित नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करुन बक्षिसे पटकावली.
विविध स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेत संस्थेचे सेक्रेटरी किशोर मुनोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुहास धीवर, शिक्षक बाबासाहेब बोडखे, मार्गदर्शक शिक्षिका कमल भोसले, सुदेश छजलाने, गोपीचंद परदेशी, कविता जोशी, वैभव शिंदे, शिल्पा पाटोळे, मोनिका मेहतानी, ठाकुरदास परदेशी, योगेश गायकवाड आदी उपस्थित होते.
किशोर मुनोत म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आवड असलेल्या क्षेत्रातील स्पर्धेत उतरले पाहिजे. स्पर्धेतून स्वत:मधील क्षमता ओळखता येतात. तर निर्माण झालेल्या उणीवा भरुन काढून यशस्वी वाटचाल करता येते. जीवनात प्रत्येक स्पर्धेला सामोरे जावे लागते. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:ला ज्ञानाने सक्षम करुन स्पर्धेत उतरण्याचे त्यांनी आवाहन केले.
सुहास धीवर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेबरोबर त्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे. शिक्षणाबरोबर त्यांना कलागुण जोपासण्यासाठी शिक्षक वर्ग मार्गदर्शन करत असून, स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्यातील कलागुण प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वरचित हिंदी कविता सादरीकरण स्पर्धेत कोमल शिवराम बैरवा (इयत्ता दहावी) हिने द्वितीय तर शालेय निबंध स्पर्धेत (मोठा गट) प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच निबंध स्पर्धेत रौनक प्रसाद द्वितीय व कोमल वैष्णव यांनी तृतीय क्रमांक मिळवला. लहान गट निबंध स्पर्धेत प्रथम- सोनम बैरवा, द्वितीय- पलक शर्मा, तृतीय-पायल चौधरी क्रमांकानी यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना शिक्षिका कमल भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.