स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त निमगाव वाघा येथे रंगणार संमेलन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती तसेच राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर निमगाव वाघा (ता. नगर) येथे होणाऱ्या चौथ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व निवृत्त पोलीस अधिकारी सुभाष का. सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. हे साहित्य संमेलन दि. 12 जानेवारी रोजी गावातील परिवार मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
हे संमेलन स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि श्री नवनाथ युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती तसेच राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे.
या संमेलनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत व युवकांसाठी हे संमेलन प्रेरणादायी ठरणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे व श्री नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे यांनी दिली.
सुभाष का. सोनवणे हे एक संवेदनशील साहित्यिक असून त्यांनी यापूर्वी सहावे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. विविध कवी संमेलनांमध्येही त्यांनी अध्यक्ष म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. त्यांची ‘व्यथीत सावल्या’, ‘वेदनेच्या कळा’ आणि ‘स्नेहबंध’ ही साहित्यकृती प्रकाशित असून वाचकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे. साहित्याबरोबरच त्यांनी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमध्येही अभिनयाच्या भूमिका साकारून आपली बहुआयामी ओळख निर्माण केली आहे.
साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना महात्मा फुले फेलोशिप (दिल्ली), वीर भारती पुरस्कार, काव्ययात्री पुरस्कार, कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची चौथ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
