जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सब-ज्युनियर (13 वर्षांखालील मुले व मुली) तसेच वरिष्ठ महिला (खुला गट) राज्य अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या पुढाकाराने राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील सर्व पात्र आणि उत्सुक खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव रोनप फर्नांडिस यांनी केले आहे.
निवड चाचणी व प्रशिक्षण शिबीर 21 एप्रिलपासून अहमदनगर कॉलेजच्या फुटबॉल मैदानावर दररोज संध्याकाळी 4:30 ते 6:30 या वेळेत घेण्यात येणार आहे. या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी सर्व खेळाडूंना सीआरएस (सेंट्रल रजिस्ट्रेशन सिस्टम) नोंदणी अनिवार्य आहे. मात्र, जे खेळाडू यापूर्वी जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या 15 वर्षाखालील संघात किंवा फिरोदिया शिवाजीयन्स क्लबच्या स्टेट यूथ लीग संघात खेळले आहेत आणि वयोमर्यादेत बसतात, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. तसेच, जे खेळाडू 31 मे 2025 पर्यंत आधीपासून सीआरएस वर नोंदणीकृत आहेत, त्यांनाही पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही.
सीआरएस नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये मूळ आधार कार्ड, जन्मदाखला, पासपोर्ट साइज फोटो आणि पालकांचे संमतीपत्र यांचा समावेश आहे. ही कागदपत्रे स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात adfa197273@gmail.com या ई-मेल पत्त्यावर पाठवावी लागतील.
सब-ज्युनियर गटासाठी (मुले व मुली) 1 जानेवारी 2012 ते 31 डिसेंबर 2013 दरम्यान जन्मलेले खेळाडू पात्र ठरतील. निवड झालेले खेळाडू अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना राज्य अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत सहभागी होतील. या राज्यस्तरीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघासाठी निवड होणार आहे. अधिक माहितीसाठी 7709070169 / 9657538868 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.