जेएसएस गुरुकुलने विद्यार्थ्यांना दाखविला संभाजी महाराजांच्या जीवनावरील सिनेमा
संभाजी महाराजांच्या संघर्षापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार -निकिता कटारिया
नगर (प्रतिनिधी)- स्वराज्यासाठी बलिदान देऊन पराक्रमाचा इतिहास गाजविणारे छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वाजल्य इतिहास ज्ञात होण्यासाठी संभाजी महाराजांच्या जीवनावर सिनेमा शालेय विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. केडगाव, मोहिनी नगर येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेला लढा, अनेक युध्दात मिळवलेला विजय, अंगावर शहारे आणणारे विविध घटना व अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा थरारक अनुभव सिनेमातून घेतला.
कोहिनूर मॉल येथील सिनेमागृहात स्कूलचे प्राचार्यआनंद कटारिया आणि निकिता कटारिया यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
निकिता कटारिया म्हणाल्या की, छत्रपती संभाजी महाराजांनी आठ-नऊ वर्षांच्या कार्यकाळात एकूण 120 युद्धे लढली व सर्वच्या सर्व युध्दात विजय मिळवला. असा पराक्रम करणारे संभाजी महाराज हे एकमेव योध्दे होते. त्यांनी स्वराज्यासाठी दिलेला लढा सर्वांसाठी स्फुर्ती देणारा आहे. त्यांच्या संघर्षापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना सिनेमा दाखविण्यात आला. शाळेत शिक्षणासह विद्यार्थ्यांवर महाराष्ट्राची संस्कृती व संस्कार रुजविण्याचे कार्य केले जात आहे. मोबाईलमध्ये गुंतलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी विविध उपक्रम शाळेत सुरु आहे.
