लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची दिवाळीनिमित्त स्वदेशी व प्लास्टिक मुक्तीचा नारा देत आकर्षक रंगीबेरंगी कागदाचे पर्यावरणपूरक आकाश कंदील तयार केले.

तर मातीच्या पणत्यांना आकर्षक रंग देऊन सजावट केली. या दिवाळीत चायनाचे आकाश कंदील व पणत्या न वापरता स्वत: तयार केलेले आकाश कंदील, पणत्या वापरण्याचा संकल्प केला.

कार्यानुभव कार्यशाळेतंर्गत विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी आकाश कंदील बनवा व पणत्या सजवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सर्व शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सुंदर व कल्पकतेने, वेगवेगळ्या टाकाऊ वस्तूंचा व क्राफ्ट पेपरचा वापर करून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक आकाश कंदील बनवले. तर मातीच्या पणत्यावर रंगकामासह विविध कलाकुसरीचे काम करुन सजावट केली. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.

प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. या उपक्रमासाठी विभागप्रमुख सुजाता दोमल, शिल्पा कानडे यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. माध्यमिकच्या प्राचार्य छाया काकडे यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी उर्मिला साळुंखे, मीनाक्षी खोडदे, शितल रोहोकले, जयश्री खांदोडे, सोनाली अनभुले, सोनाली वेताळ, रूपाली जाधव, पुनम घाडगे, इंदुमती दरेकर यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा व त्यांनी बनवलेल्या वस्तूंपासून दिवाळी साजरा करण्याचा आनंद मिळण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चायना वस्तूंचे व पर्यावरणाला घातक ठरणारे प्लास्टिकचे आकाश कंदीलवर पर्याय म्हणून विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले आकाश कंदील त्यांच्या घरावर दिसणार आहे. -शिवाजीराव लंके (मुख्याध्यापक, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय)
