श्रीगोंदा ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण
नगर (प्रतिनिधी)- परिट समाजाच्या सामायिक क्षेत्रात सुरु असलेले बांधकाम त्वरीत थांबविण्याच्या मागणीसाठी श्रीगोंदा येथील ज्येष्ठ नागरिक बाळू काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले. या उपोषणात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, निलेश काळे, संदीप शिंदे, जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने आदी सहभागी झाले होते.
भूमापन क्रमांक 1770 मधील परिट समाजाच्या सामायिक क्षेत्रावर एका कुटुंबीयांनी बांधकाम सुरु केलेले आहे. त्या जागेवर बांधकाम करणाऱ्यांनी घरकुल योजना मंजूर करून घेतली आहे. या प्रकरणात श्रीगोंदा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काळे यांनी 2 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सदरच्या अवैध बांधकामा संदर्भात लेखी तक्रार दिली होती. या संदर्भात बांधकाम थांबवण्याचे आदेश देण्यात आले. मात्र विद्यमान दिवाणी न्यायाधीश श्रीगोंदा न्यायालयात गैरअर्जदार यांनी तक्रारदार यांच्याविरुद्ध मनाई हुकूमाचा दावा दाखल केला होता. न्यायालयाने सदरचा दिवाणी न्याय निवडा 3 एप्रिल 2018 रोजी आदेश पारित केला.
या आदेशानुसार एकूण क्षेत्र पैकी 640.9 मधील 234.83 क्षेत्र मध्ये गैरअर्जदार यांचे पक्के बांधकाम, उर्वरित 406.7 मध्ये अर्जदार व इतर यांना कपडे धुणे, वाळू घालवणे तसेच इतर वापर करण्याचा अधिकार न्यायालयाने दिला. सदरचे वादग्रस्त क्षेत्रफळ भूमापन क्रमांक 1770 चे प्रकरण न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ठ आहेत. समोरील गैरअर्जदार न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता श्रीगोंदा नगरपालिकेचे अधिकारी यांच्याशी आर्थिक तडतोड करून उपरोक्त क्षेत्र 406.7 मध्ये अवैध बांधकाम सुरु असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तर परिट समाजाच्या सामायिक क्षेत्रात सुरु असलेले बांधकाम त्वरीत थांबवावे, श्रीगोंदा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी न्यायालयाच्या आदेशाचे अवमान केल्याप्रकरणी चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.