• Tue. Feb 17th, 2026

एमआयडीसीत कथित कामगार संघटनेचे पुढारी व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घाला

ByMirror

Feb 16, 2026

आमी घटनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन


उद्योजकांमध्ये दहशत पसरविणाऱ्यांवर कारवाईचे पोलीस अधीक्षक घार्गे यांचे आश्‍वासन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसीत कथित कामगार संघटनेचे पुढारी व काही अनोळखी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना सोबत घेऊन कंपनीच्या आवारात अनधिकृत प्रवेश करत असल्याप्रकरणी सुयश मेटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक व असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज (आमी) संघटनेच्या सदस्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन दिले. तर औद्योगिक वसाहतीतील दहशत कायमस्वरूपी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.


यावेळी आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, मा. उपाध्यक्ष संजय बंदिष्टी, दिलीप अकोलकर , सह सचिव सतीश गवळी, सचिव प्रफुल्ल पारख, सचिव सुमितलोढा, एमसीसीआयचे अरविंद पारगावकर, निखिल लोढा, दीपक नागरगोजे,मिलिंद दिनकर कुलकर्णी, मिलिंद एकनाथ कुलकर्णी, बालकृष्ण नरोडे, संदीप कोद्रे, राजेंद्र शुक्रे,रिसे साहेब ,प्रमोद भारुळे ,सुहास फुंदे , संदेश पिंपळकर , भूषण भणगे , सुभाष गुगळे , रोहकले साहेब ,दिनेश मुनोत, सुमित सोनवणे निनाद टिपुगडे, गोकुळ हांडे सचिन काकड इत्यादी सह बहुसंख्येने उद्योजक उपस्थित होते.


अहिल्यानगर येथील औद्योगिक वसाहतीत अलीकडे वाढत चाललेल्या दहशतीच्या घटनांमुळे उद्योजक व कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. औद्योगिक वसाहत आकाराने लहान असली तरी तीच अहिल्यानगरच्या अर्थव्यवस्थेची मुख्य जीवनरेषा आहे. अनेक लघु उद्योग हे पूर्वाश्रमिच्या कामगारांनी एकत्र येऊन उभारलेले असल्याने उद्योगांवर होणारा कोणताही दबाव हा संपूर्ण आर्थिक व्यवस्थेला धक्का देणारा ठरत आहे.


निवेदनानुसार, कथित कामगार संघटनेचे पुढारी व काही अनोळखी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना सोबत घेऊन कंपनीच्या आवारात अनधिकृत प्रवेश केला. या वेळी कंपनीचे कामकाज बंद पाडण्याचा मानस असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, तथा कथित व्यक्ती व त्यांच्या साथीदारांनी सुयश मेटल कंपनीच्या मालकांच्या घरी जाऊन मोठ्या प्रमाणावर तोडफोड करून घरातील वस्तूंचे नुकसान केल्याचेही निवेदनात नमूद आहे. यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज व छायाचित्रे पुराव्यासह प्रशासनाकडे देण्यात आली आहेत.


या गंभीर प्रकरणाची दखल घेत अशा व्यक्ती व साथीदारांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच औद्योगिक वसाहतीतील दहशत कायमस्वरूपी दूर करण्यासाठी स्थानिक पोलिसांना त्वरित कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी आमी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे म्हणाले की, “कोणाकडूनही दबाव, धमकी, खंडणी किंवा दहशतीचा प्रकार होत असल्यास उद्योजकांनी घाबरून न जाता तातडीने स्वतःहून तक्रार दाखल करावी. पोलिस प्रशासन पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे आश्‍वासन दिले.


पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाईचे आश्‍वासन
या प्रकरणासंदर्भात अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उद्योजकांना आश्‍वासन देत स्पष्ट केले की, “औद्योगिक वसाहतीत दहशत निर्माण करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. भविष्यात अशा प्रकारचा दबाव, धमकी किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तात्काळ धडा शिकवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *