जातीजनगणना, एनपीआर व आरक्षण उपवर्गीकरणावर होणार चर्चा
नगर (प्रतिनिधी)- युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेचे दुसरे महाराष्ट्र राज्य अधिवेशन रविवारी (दि.10 ऑगस्ट) सकाळी 10:30 ते सायं. 5:30 या वेळेत शहरातील टिळक रोड लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे पार पडणार आहे. हे अधिवेशन राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्ष व प्रा.डॉ. हरी नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आले आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन डॉ. विजयकुमार ठुबे (ज्येष्ठ मार्गदर्शक, मराठा सेवा संघ, अहिल्यानगर) यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थान कमलाकांत काळे (राष्ट्रीय अध्यक्ष, युनिटी ऑफ मूलनिवासी समाज) भूषवणार आहेत. राज्यभरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक विचारवंत आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनाचा प्रमुख हेतू बहुजन समाजामध्ये सामाजिक ऐक्य, सहकार व समन्वय निर्माण करणे, तसेच संविधानिक हक्क-अधिकारांची प्राप्ती करण्यासाठी एकजूट निर्माण करणे हा आहे. या अधिवेशनात समाजातील ज्वलंत प्रश्नांवर सखोल विचारमंथन होणार असून, खालील विषयांना विशेष महत्त्व देण्यात येणार आहे. जाती आधारित जनगणना, सामाजिक न्यायासाठीचे महत्त्व व अंमलबजावणीतील आव्हाने, एनपीआर हीच खरी एनआरसी याविषयी सखोल व गंभीर चर्चा, अनुसूचित जाती-जमाती आरक्षणातील उपवर्गीकरण शासक वर्गाची भूमिका व तिचे विश्लेषण, स्वर्णिम भारताची पुनर्निर्मिती यात विद्यार्थी, युवा, महिला व बुद्धिजीवी वर्गाची जबाबदारी, सामाजिक-सांस्कृतिक ध्रुवीकरण बहुजन समाजाचे ऐक्य टिकवून जातीय षड्यंत्राचा मुकाबला कसा करावा? या संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.
बहुजन समाजातील विद्यार्थी, युवा, महिला व बुद्धिजीवी वर्गाने या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र करंदीकर, प्रदेशाध्यक्ष प्रा. अजित खरसडे, तसेच मिलिंद सुर्वे, बी. एच. नितनवरे, नामदेव राळेभात, सौरव बोरुडे, शरद नगरे, संजय सावंत, सारंग घोडेस्वार, संजय कांबळे, रफिक शेख, नामदेव गुरव, शामराव काते, प्रमोद कांबळे, अय्युब बागवान, दीक्षा बचाटे, माही सुर्यवंशी, पुष्पाराणी बनकर आदींनी केले आहे.