14 व 17 वर्ष गटातील मुलांच्या संघाची दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
नगर (प्रतिनिधी)- स्टेअर्स फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत स्टेअर्स अहिल्यानगर फुटबॉल संघाने विजेतेपद पटकाविले. 14 वर्षे मुले व 17 वर्षे मुलांनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. या विजयी संघाची दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अहिल्यानगर फुटबॉल संघातील 14 वर्षे मुले व 17 वर्षे मुले या वयोगटात दुहेरी मुकुट साखळी सामन्यात 14 वर्षातील मुलांनी बीड, पुणे, रायगड, गोंदिया या संघावर विजय मिळवून अंतिम सामन्यात जालना जिल्ह्याच्या संघाला 2-0 ने पराभव करून विजय मिळविला. तसेच 17 वर्षे वयोगटातील मुलांनी साखळी सामन्यात रायगड, गोंदिया, सातारा, बीड जिल्ह्यांना पराभव करून अंतिम सामन्यात जालना विरुद्ध अहिल्यानगर स्टेअर्स फुटबॉल संघाने पराभव करून अंतिम सामना अहिल्या नगरच्या नावे केला.
या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून भार्गव पिंपळे, शुभंकर सावंत, अमर शेख यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या राज्यस्तरीय स्पर्धेतून अहिल्यानगरचा संघ दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. विजयी संघाचे व प्रशिक्षकांचे अहिल्यानगर स्टेअर्स फुटबॉल चे अध्यक्ष विजू कमलात (टायरवाले), उपाध्यक्ष डॉक्टर प्रताप पटारे, उपाध्यक्ष विन्सेंट फिलिप्स, नमोह फुटबॉल क्लबच्या संचालिका नमिता फिरोदिया, बेलेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे अभिजीत बेलेकर, उद्योजक आदेश भगत, सुभाष कनोजिया, मनीष राठोड, व सदस्य निलेश हराळे, वृषाली पटेकर, राहुल जोशी, अर्जुन खेकडे अभिनंदन केले. 14 वर्षे वयोगटातील खेळाडूंना प्रशिक्षक सौरभ चव्हाण, रितिक चव्हाण व 17 वर्ष वयोगटातील खेळाडूंना प्रसाद पाटोळे, मयूर टेमक यांचे मार्गदर्शन लाभले.