• Sat. Jul 19th, 2025

पेन्शनर शिक्षकांसह खासदार लंके दिल्ली दौऱ्यावर

ByMirror

Jul 19, 2025

पंतप्रधान व अर्थमंत्री यांची भेट घेऊन मांडणार प्रश्‍न


संसद, राष्ट्रपती भवनासह दिल्लीतील विविध स्थळांना देणार भेटी


पिढ्या घडविण्याचे काम करणारे सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्‍न सोडविणे ही सामाजिक जबाबदारी -खा. निलेश लंके

नगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या आणि अनेक पिढ्या घडवलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्या पूर्ण होण्यासाठी पुढाकार घेऊन खासदार निलेश लंके यांनी तब्बल 200 सेवानिवृत्त शिक्षकांना दिल्ली दौऱ्यावर घेऊन निघाले. केंद्र सरकारकडे थेट शिक्षकांच्या प्रश्‍नांची मांडणी करणे आणि त्यांना एक सुखद आठवण म्हणून राजधानीतील दर्शन घडवणे हा उद्देश घेऊन दिल्ली वारीसाठी खासदारांसह सेवानिवृत्त शिक्षक शनिवारी (दि. 19 जुलै) रेल्वेने रवाना झाले.


शहरातील रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक द.मा. ठुबे, बन्सी उबाळे, ज्ञानदेव लंके, विनायक कोल्हे, अशोकराव बागुल, महादेव गांगर्डे, सूर्यभान काळे, किशोर हार्दे, अशोक धसाळ, दत्तात्रय गावडे, गजानन ढवळे, प्रदीप खिलारी, पोपट इथापे, नन्नवरे, बाळासाहेब लगड, अशोक गायकवाड, रावसाहेब पवार, विनीत कोल्हे, अनिल नलगे, मोहन पवार आदींसह सर्व तालुका अध्यक्ष, तालुकाप्रमुख यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या दौऱ्यात खासदार लंके यांच्या माध्यमातून सेवानिवृत्त शिक्षक पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सितारामन व शरद पवार यांची भेट निश्‍चित करण्यात आली आहे. तसेच यावेळी संसद व राष्ट्रपती भवनाची पहाणी करणार आहेत. सेवानिवृत्त शिक्षकांच्या पेन्शन, वेतन विसंगती, वैद्यकीय सुविधांबाबतचे मुद्दे मांडले जाणार आहेत.


खासदार निलेश लंके म्हणाले की, अनेक पिढ्या घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यांचे प्रश्‍न सोडविणे ही सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. शिक्षक ही माझ्या जीवनाची मूलभूत प्रेरणा आहेत. माझे वडीलही शिक्षक होते. त्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मी सदैव कार्यरत आहे. सेवानिवृत्त शिक्षकांसाठी हे अविस्मरणीय क्षण असून, बहुतांश शिक्षक पहिल्यांदाच दिल्लीला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


बन्सी उबाळे म्हणाले की, एका शिक्षकाचे मुलगा असल्याची जाणीव ठेऊन सेवानिवृत्त शिक्षकांना खासदार लंके यांनी दिलेला मान-सन्मान कौतुकास्पद आहे. सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्‍न गंभीर होत असताना, त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार अभिमानास्पद असल्याचे सांगितले.


द.मा. ठुबे यांनी खासदार लंके यांनी आश्‍वासनाची पूर्तता करुन सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्‍न दिल्ली दरबारी मांडण्यासाठी सर्वांना घेऊन गेले आहेत. त्यांची काम करण्याची व प्रश्‍न सोडविण्याची तळमळ पाहून सर्व माजी शिक्षक भारावल्याचे त्यांनी सांगितले.


या दिल्ली यात्रेत प्रवास, निवास व भोजन यांची उत्तम व्यवस्था खासदार लंके यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. तसेच दिल्ली मधील ऐतिहासिक, धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याची संधी शिक्षकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे बहुतांश शिक्षक दिल्लीला पहिल्यांदाच जाणार असल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *