महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्यसेवेचा उपक्रम
250 हून अधिक ग्रामस्थांनी घेतला मोफत नेत्र तपासणीचा लाभ
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महात्मा ज्योतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आरोग्यप्रती सजगता वाढवणाऱ्या या सामाजिक उपक्रमाचे आयोजन सावली चॅरिटेबल फाउंडेशन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व स्टार आयसीयू, ग्रामपंचायत निमगाव वाघा, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, एकता फाउंडेशन आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य व डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके, डॉ. विजय जाधव, अनिल डोंगरे, गणेश येणारे, ज्ञानेश्वर उधाळ, शिवाजी जाधव, बापू महांडुळे आणि संदीप डोंगरे यांच्या उपस्थितीत पार पडले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, सध्या आरोग्य सेवा महाग झालेली असताना सामान्य जनतेला तिचा लाभ घेणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मोफत शिबिरे गरजूंसाठी आशेचा किरण ठरतात. त्यांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमधील वाढत्या दृष्टीदोषाच्या पार्श्वभूमीवर नेत्र तपासणी शिबिर महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
अतुल फलके यांनी सांगितले की, ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा पोहचण्याची गरज आहे. शेतकरी वर्ग आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे आजार गंभीर रूप धारण करतात. वेळच्यावेळी तपासणी झाल्यास अनेक त्रास टाळता येऊ शकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिरात अद्ययावत संगणकीय उपकरणांद्वारे 250 पेक्षा अधिक ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली. गरजू नागरिकांना अल्प दरात नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले. तसेच मोतीबिंदू व काचबिंदूसारख्या डोळ्यांच्या आजारांसाठी डॉ. अनभुले हॉस्पिटल, प्रेमदान चौक येथे मोफत शस्त्रक्रियेची सोय करण्यात आली आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. दिलीप भालेराव, डॉ. मनीषा भालेराव, सायली शिंदे, सावली जाधव, सुमन जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.