ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांना मिळाले विविध दाखले
शिक्षण, नोकरी व शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले. महसूल सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या या अभियानाला ग्रामस्थांसह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार नेप्ती गावातील स्वस्तिक मंगल कार्यालयात सदर अभियान राबविण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी प्रताप कळसे व सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, सरपंच संजय जपकर, मंडळ अधिकारी प्रताप कळसे, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, शिवाजी होळकर, मनोहर काळे, अनिल पवार, मंडळातील ग्राम महसूल अधिकारी सुवर्णा रांधवन, रूपाली म्हस्के, दिपाली विधाते, दीपक झेंडे, विनायक दिक्षे, अमोल औटी, सुभाष नेमाने, भानुदास फुले, सुरज पवार, श्रीकृष्ण निमसे आदींसह परिसरातील शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिलियर आदी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे अनेकांना शिक्षण, नोकरी व शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच वृद्धांना संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, जिवंत सातबारा-टप्पा एक व टप्पा दोन, ॲग्री स्टॅक या योजनेची माहिती देण्यात आली.
एकाच छताखाली अनेक सेवा ही संकल्पना या शिबिराच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवली गेली. नागरिकांना विविध खात्यांची कार्यालये न फिरता, एकाच ठिकाणी सेवा मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.