कराळे क्लब हाऊस संघाने पटकाविले विजेतेपद
45 सामन्यात नोंदवले गेले 150 गोल
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल लीग स्पर्धा 2024-25 मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडली. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत सीनियर डिव्हिजन मधील 10 संघानी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील 45 सामने हे लीग पद्धतीने (ऑल प्ले ऑल) खेळवण्यात आले. यामध्ये 150 गोल नोंदवले गेले. कराळे क्लब हाऊस संघाने विजेतेपद तर सुमन इंटरप्राईजेस फुटबॉल क्लबने उपविजेतेपद पटकाविले. विजेत्या संघात चषक 21 हजार रुपये रोख व उपविजेत्या संघास चषक 15 हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले.
अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव रोनप फर्नांडिस म्हणाले की, या स्पर्धेत 200 हून अधिक युवा फुटबॉल खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे आणि स्पर्धात्मकतेचे प्रदर्शन केले. हे संपूर्ण वर्ष फुटबॉलसाठी अत्यंत उत्सावर्धक ठरणार आहे. जिल्ह्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी काळात बी.पी. हिवाळे करंडक यामध्ये शहरातील सर्वोत्तम 6 आणि राज्यभरातील 10 संघ अशा 16 संघांचा सहभाग असणार आहे. अलेक्स करंडक आणि एस.के. करंडक यांसारख्या प्रतिष्ठित स्पर्धा नियोजित करण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच नुकतेच झालेल्या या स्पर्धेसाठी जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आणि वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांचे अमूल्य पाठबळ आणि सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे उपाध्यक्ष खालील सय्यद, जोगासिंग मिन्हास, रिशपालसिंग परमार, व्हिक्टर जोसेफ, प्रदीप जाधव, राजू पाटोळे, जेव्हिअर स्वामी, रणबीरसिंग परमार, रमेश परदेशी, भाऊ भिंगारदिवे, अभिषेक सोनवणे, वैभव मनोदिया, सुमित राठोड आणि जिल्हा फुटबॉल संघटनेच्या सर्व पंचांचे विशेष योगदान लाभले. ही स्पर्धा जिल्ह्यातील फुटबॉल खेळाला चालना देण्यासाठी एक मैलाचा दगड दगड ठरली आहे. पुढील काळात अजून मोठ्या स्पर्धा आयोजित करून फुटबॉलचा प्रसार करण्याचा जिल्हा फुटबॉल संघटनेने मानस व्यक्त केला आहे.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-
विजयी- कराले क्लब हाऊस, उपविजयी- सुमन इंटरप्राईजेस फुटबॉल क्लब, अनुक्रमे फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल क्लब, फ्रेंड्स स्पोर्ट्स अकॅडमी, फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी, सिटी क्लब, गुलमोहर स्पोर्ट्स क्लब, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल क्लब, जहारवीर फुटबॉल क्लब, नमोह फुटबॉल क्लब यांनी क्रमांक पटकाविले.
वैयक्तिक पारितोषिके:-
सर्वोत्कृष्ट गोल रक्षक- यश कोठाळे (कराळे क्लब हाऊस), सर्वोत्कृष्ट खेळाडू- प्रकाश कनोजिया (सुमन इंटरप्राईजेस फुटबॉल क्लब), सर्वोत्कृष्ट उद्योन्मुख खेळाडू- शुभंकर सावंत (गुलमोहर स्पोर्ट्स क्लब).