मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावात साखळी उपोषण सुरु ठेवण्याचा निर्णय
आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मराठा समाजाला फसविण्याचे काम करत आहे -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी गावात साखळी उपोषणाला सुरुवात केली असून, ग्रामस्थांसह युवकांचा उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले आहे.
या उपोषणात ग्रामपंचायत सदस्य तथा अखिल भारतीय मराठा महासंघाचे नगर तालुकाध्यक्ष पै. नाना डोंगरे, अजय ठाणगे, भरत बोडखे, गणेश कापसे, सचिन जाधव, बाळू ठुबे, ज्ञानदेव जाधव, अनिल डोंगरे, जगन्नाथ जाधव, ऋषीकेश जाधव, अतुल फलके, पिंटू जाधव, गणेश गायकवाड, भाऊ कदम, बबन जाधव, भरत फलके, अरुण कापसे, संतोष डोंगरे, सागर कापसे, मयुर काळे, रितेश डोंगरे, विजय गायकवाड आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत गावात साखळी उपोषण सुरु राहणार असल्याचा पवित्रा निमगाव ग्रामस्थांनी घेतला आहे. पै. नाना डोंगरे म्हणाले की, आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मराठा समाजाला फसविण्याचे काम करत आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाचे पेटलेले आंदोलनाला सरकार जबाबदार असून, हा ज्वलंत प्रश्न न सोडविल्याने समाजाच्या भावना व्यक्त होत आहे.
सरकार समाजाला आरक्षणापासून रोखून ठेऊन, किती युवकांच्या आत्महत्येला जबाबदार ठरणार असल्याचा प्रश्न उपस्थित करुन सरकारच्या भूमिकेचा त्यांनी निषेध नोंदविला. तर ग्रामस्थांच्या वतीने गावात सर्व राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीच्या ठरावाचा व मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार सुधीर उबाळे यांना पै. नाना डोंगरे यांनी दिले.