• Wed. Mar 12th, 2025

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत नेत्र रोग तपासणी शिबिराला ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Mar 9, 2025

आनंदऋषीजी हॉस्पिटलची आरोग्यसेवा रुग्णांसाठी संजीवनी – भगवानदास गुगळे

नगर (प्रतिनिधी)- व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांना आनंदऋषीजी हॉस्पिटल नवजीवन देण्याचे काम करीत आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलची आरोग्यसेवा रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. सर्वसामान्य घटकांना याचा लाभ मिळत असून, सेवाभाववृत्तीने कार्य सुरु आहे. आरोग्य शिबिर घेऊन सर्वसामान्यांना आधार व निरोगी समाजासाठी हे हॉस्पिटल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या मानवसेवेच्या कार्यात गुगळे परिवाराच्या वतीने सातत्याने योगदान राहणार असल्याची भावना भगवानदास गुगळे यांनी केले.


राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 33 व्या स्मृतिदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या नेत्रालय विभागात गुगळे (भातकुडगाववाला) परिवाराच्या वतीने आयोजित मोफत नेत्र रोग तपासणी शिबिर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन भगवानदास गुगळे व मंगलाताई गुगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. पंकज गुगळे, महेश गुगळे, नेत्र तपासणी चळवळीतील समाजसेवक अशोक शिंगवी, स्मिता गुगळे, सोनल गुगळे, सार्थक गुगळे, समीक्षा गुगळे, रिया गुगळे, सिध्दार्थ गुगळे, संतोष बोथरा, आनंद छाजेड, माणकचंद कटारिया, अनिल मेहेर, डॉ. अशोक म्हाडिक, डॉ. संदीप राणे, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. प्रतिक कटारिया, डॉ. विशाल तांबे, डॉ. किरण शिंदे आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्यात भगवानदास गुगळे (भातकुडगाववाला) व परिवार सातत्याने योगदान देत आहे. हॉस्पिटल व या परिवाराचे रुग्णसेवेसाठी ऋणानुबंध निर्माण झाले असल्याचे सांगितले. तर आनंदऋषीजी नेत्रालय विभागात 98 हजार डोळ्यांच्या विविध शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. दररोज शंभरपेक्षा जास्त डोळ्यांच्या शस्त्रक्रिया होत आहे. नेत्रालयाने राज्यात रुग्णांचा मोठा विश्‍वास संपादन केला असून, मराठवाडा भागातील गरजू रुग्ण याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहे. महाराष्ट्रातील विविध भागात नेत्रालय विभागाचे 22 व्हिजन सेंटर कार्यरत आहे. ग्रामीण भागातील दृष्टी दोष असलेल्या रुग्णांच्या वाडी-वस्तीवर जाऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये आणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन पुन्हा घरी सोडण्याचे कार्य केले जात आहे. हे सेवेचे व्रत एका मिशन प्रमाणे सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.


डॉ. प्रतिक कटारिया म्हणाले की, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत दृष्टी दोष असलेल्या रुग्णांवर यशस्वीपणे उपचार व शस्त्रक्रिया आनंदऋषीजी नेत्रालयात होत आहे. गुंतागुंतीच्या अवघड शस्त्रक्रिया देखील यशस्वी करण्यात आल्या असून, 20 नेत्रतज्ञ डॉक्टरांची टीम सेवा देत आहे. तर मोठ्या शहराच्या धर्तीवर अद्यावत सुविधा नेत्रालयात उपलब्ध करुन देण्यात आल्या असून, गरजू रुग्णांसह सर्वसामान्य वर्गाला देखील ही अद्यावत सुविधा उपयोगी पडत आहे. उपचारासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची मुलांप्रमाणे काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


अशोक शिंगवी म्हणाले की, जामखेडला आनंदऋषीजी नेत्रालयाचे व्हिजन सेंटर सुरू आहे. तेथून आलेल्या दृष्टीहीन रुग्ण या आरोग्य मंदिरातून दृष्टी घेऊन जातात. 40 वर्षा पासून जामखेड मध्ये अविरत नेत्र शिबिर घेत असून, शिबिरातील रुग्णांना उपचारासाठी या नेत्रालयात दाखल करुन त्यांना दृष्टी दिली जात आहे. तर एका महिलेला सर्व हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेनंतर देखील दृष्टी येणार नसल्याचे सांगण्यात आले होते, मात्र आनंदऋषीजी नेत्रालयात त्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन तिला नवदृष्टी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


सार्थक गुगळे यांनी मानव जात ही एक समान असून, या मानवतेच्या भावनेने आनंदऋषीजी हॉस्पिटल कार्य करत असल्याचे स्पष्ट केले. रिया गुगळे हिने आरोग्य शिबिरातून सर्व सामान्यांना आधार मिळत आहे. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवेचा लाभ पोहचवून माणुसकीच्या भावनेने उभे राहिलेले हे मानवतेचे कार्य असल्याचे सांगितले. एका रुग्णाच्या नातेवाईकाने देखील हॉस्पिटल हे मानवतेचे मंदिर झाले असून, येथे सेवाभाव जपला जात असल्याची भावना व्यक्त केली. या शिबिरात 750 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. यामधील गरजू रुग्णांवर अल्पदरात मोतीबिंदू, काचबिंदू आदी नेत्र दोषाच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद छाजेड यांनी केले. आभार अनिल मेहेर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *