• Thu. Nov 13th, 2025

शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या प्रयत्नाने विशेष शिक्षकांना मिळाला न्याय

ByMirror

Nov 6, 2025

विशेष शिक्षकांचे वेतन फरकासह अदा; ज्ञानेश्‍वरी ग्रंथ भेट देऊन सत्कार


दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी “आनंद सप्ताह” राबविण्याचाशिक्षण विभागाची संकल्पना

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी विशेष शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांची तात्काळ दखल घेत, त्यांना वेतन फरकासह अदा करून न्याय मिळवून दिला आहे. या संवेदनशील निर्णयामुळे जिल्ह्यातील विशेष शिक्षकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा विशेष शिक्षक उमेश शिंदे व रामेश्‍वर ढगे यांनी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांचा “ज्ञानेश्‍वरी ग्रंथ” भेट देऊन सत्कार केला.


सत्कार सोहळ्यावेळी जिल्ह्यातील शालार्थ काम पाहणारे योगेश पंढारे यांचाही विशेष शिक्षकांच्या वतीने गौरव करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे पाटील यांनी या प्रसंगी विशेष शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत, “विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याचे उत्कृष्ट आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन होऊन त्यांनाही सामान्य शिक्षकांप्रमाणे पुरस्कार दिले गेले पाहिजेत,” अशी प्रेरणादायी संकल्पना मांडली.


त्यांनी पुढे सांगितले की, “आदर्श कार्य करवून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि विशेष शिक्षकांना प्रेरणा देणे हे शिक्षण विभागाचे कर्तव्य आहे.” जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी “आनंद सप्ताह” हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची संकल्पना मांडली. 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन आनंद सप्ताह मध्ये विविध स्पर्धा, कला प्रदर्शन, वकृत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, विद्यार्थ्यांना आत्मविश्‍वास व आनंद देणारे वातावरण निर्माण करण्याचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला.


या संकल्पनेतून महानगरपालिका शहरस्तरावर “रिमांड होम केंद्रामध्ये दिव्यांग विद्यार्थी आनंद सप्ताह” आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती विशेष शिक्षक उमेश शिंदे व रामेश्‍वर ढगे यांनी दिली. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि निर्णयक्षमता ही शिक्षकांप्रती असलेल्या आदराची जाणीव करून देते. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *