उद्योजक हरजितसिंह वधवा यांचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना निवेदन
एमआयडीसीसाठी विविध सुविधा देऊन ग्रामपंचायत कर व वीज दर कमी करण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- शहराच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीकोनाने अहिल्यानगर मधील एमआयडीसीत सुविधा निर्माण करुन, उद्योग विस्ताराकरिता जागा उपलब्ध करुन द्यावी व स्वतंत्र्य पोलीस स्टेशनची मागणी महाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनिअर असोसिएशनचे हरजितसिंह वधवा यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी उद्योजक आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, सुमित लोढा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवांगे आदींसह उद्योजक उपस्थित होते.
एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेले उद्योग मंत्री सामंत यांची भेट घेऊन शहराच्या एमआयडीसी मधील प्रश्नांबाबत वधवा यांनी लक्ष वेधले. यावेळी सामंत यांनी संबंधित एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करुन सदरील प्रश्न सोडविण्याबाबत सूचना केल्या.
शहरातील औद्योगिक वसाहत येथे भूखंडाची अत्यंत आवश्यकता आहे. उद्योग विस्ताराकरिता भूखंड उपलब्ध नसल्याने मोठे प्रकल्प येण्यास अडचण येत आहे. वन विभागाकडून 600 एकर जमीन एमआयडीसीसाठी अधिग्रहण करण्यास मंजूरी मिळालेली असताना, त्याला चालना दिल्यास येथील उद्योग विस्ताराकरिता जागा उपलब्ध होऊ शकणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे.
एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात चोऱ्या व इतर गुन्हेगारी वाढली आहे. यासाठी स्वतंत्र्य पोलीस स्टेशनची गरज निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एमआयडीसीच्या उद्योजकांकडून ग्रामपंचायत मोठ्या प्रमाणात टॅक्स वसूल करत आहे. तसेच विद्युत महावितरणने देखील मोठ्या प्रमाणात वीज दरवाढ केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये उद्योजकांना मोठ्या आर्थिक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतकडून वसूली केले जाणारे टॅक्स कमी करावे व विद्युत महावितरणकडून उद्योजकांना इतर राज्यांप्रमाणे वीज दरात सवलत देण्याची मागणी उद्योजक वधवा यांनी केली आहे.