शाळेच्या वतीने सत्कार
शाळेत फक्त पुस्तकी ज्ञान न देता, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले जाते -आनंद कटारिया
नगर (प्रतिनिधी)- जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलचा विद्यार्थी सोहम अशोक वाघस्कर याने रोटरी मिडटाऊन करंडक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. स्कूलचे प्राचार्य आनंद कटारिया यांनी वाघस्कर याचा सत्कार केला. याप्रसंगी शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आनंद कटारिया म्हणाले की, विद्यार्थ्यांना शाळेत फक्त पुस्तकी ज्ञान न देता, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उपक्रम राबविले जात आहे. विद्यार्थ्याला ज्या क्षेत्राची आवड आहे, ती आवड ओळखून त्याला योग्य मार्गदर्शन करुन स्पर्धेत उतरविण्यात येत आहे. शाळेचे योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे विद्यार्थी विविध स्पर्धेत चमकत असल्याचे त्यांनी सांगितले.
नुकतीच शहरात रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर मिडटाऊनच्या वतीने आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये मोठ्या संख्येने शहरातील शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल वाघस्कर याला गोल्डन माईक पारितोषिक स्वरुपात प्रदान करण्यात आले. तो जेएसएस स्कूलचा इयत्ता 5 वीचा विद्यार्थी आहे. या स्पर्धेसाठी त्याला त्याच्या आईने विशेष मार्गदर्शन केले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.